Atomic Habits Book Summary Marathi ।। अटॉमीक हॅबिट्स पुस्तकाचा सारांश
Atomic Habits म्हणजे खूप लहान सवयी! या सवयी खूप लहान तर असतात मात्र आपल्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकतात. सवय चांगली असो किंवा वाईट, त्याचा परिणाम हा होतोच.
पण सवयी लागतात कशा? आपण नेमकं कोणाकडून सवयी घेतो हे आपल्याला माहिती नसतं. आज आपण हेच जाणून घेऊयात की आपल्या नकळत आपण कोणाचे अनुकरण करत असतो आणि कोणाकडून सवयी घेतो.
Atomic Habits Book Review Marathi
पुस्तकाचे नाव- अटॉमीक हॅबिट्स (Atomic Habits)
लेखकाचे नाव- जेम्स क्लीअर (James Clear)
अटॉमीक हॅबिट्स हे जेम्स क्लीअर यांचे पुस्तक आहे. या पुस्तकात जेम्स यांनी चांगल्या सवयी कशा लावायच्या आणि वाईट सवयी कशा घालवायच्या याविषयी सांगितलेले आहे. हॅबिट्स या विषयावरील हे सर्वात पॉवरफुल पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्याला गोल्स वर फोकस करण्यापेक्षा सिस्टम वर फोकस करण्याबद्दल खूप छोटे मात्र प्रभावित बदल करण्याबद्दल शिकवते.
अटॉमीक हॅबिट्स पुस्तकातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत मात्र यातील दोन महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.
१) आपल्याला लागणाऱ्या सवयी मागे कोणाचा हात असतो.
२) चांगल्या अटॉमीक (आण्विक) सवयीसाठी काय करायला पाहिजे.
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याला एकट राहण्यापेक्षा लोकांमध्ये मिळून मिसळून राहायला आवडते. म्हणून तर आपले पूर्वज जर आपण बघितले तर ते अष्मयुगापासून एकत्रपणे म्हणजेच टोळी करून राहतात.
आपल्याला सुरुवातीच्या काळात ज्या सवयी लागतात त्या आपण निवडलेल्या नसतात. या सवयी आपल्याला इतरांना फॉलो केल्याने लागतात. आपण मुख्यतः 3 प्रकारच्या लोकांचे अनुकरण करतो. आपले विकसित होणारे व्यक्तिमत्व देखील याच लोकांमुळे विकसित होते. आपण कोणाचे अनुकरण करतो?
१) आपल्या जवळचे लोक - यामध्ये मित्र आणि कुटुंबातील सदस्य येतात. आपल्या जवळचे लोक म्हणजे आपण सतत ज्यांच्या सोबत असतो आणि म्हणूनच त्यांच्या वागणुकीचा आपल्यावर खूप प्रभाव पडतो. तुमच्या मित्राला जर व्यसनाची सवय असेल तर या गोष्टीची शक्यता जास्त आहे की तुम्हाला देखील व्यसन लागू शकते. आपण ज्या व्यक्तीच्या जितक्या जास्त जवळ असतो त्यांच्या सवयी आपण तितक्या जास्त वेगाने अनुकरण करून घेत असतो.
त्यामुळे तुम्हाला जर जास्त काही मेहनत न घेता चांगल्या सवयी लावून घ्यायच्या असतील तर अशा मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा जे तुम्हाला विकसित व्हायला जास्त मदत करतील.
उदाहरण द्यायचे झाले तर जर तुमच्या एखाद्या मित्राला पुस्तक वाचण्याची किंवा जिमला जाण्याची आवड असेल तर त्याच्या सोबत राहून तुम्हाला देखील जिमला जाण्यास किंवा पुस्तक वाचायला आवडू लागेल.
२) बहुसंख्य लोकांचे अनुकरण - आपल्या सवयी आणि विचारांवर सर्वात जास्त प्रभाव हा या घटकाचा असतो. सोसायटी, समाज आणि धर्म हे सर्व घटक यामध्ये येतात. एखादी गोष्ट जर खूप जास्त लोक खरी मानत असतील तर आपण देखील ती खरी मानत असतो. खऱ्या गोष्टीची बाजू घेऊन एकट पडण्यापेक्षा बहुसंख्य लोकांनी मान्य केलेले खोटे आपण मान्य करतो.
सर्वात सोपे उदाहरण सांगायचे झाल्यास आपण जेव्हा फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्म वरून शॉपिंग करतो तेव्हा आपण त्या वस्तूला खरेदी करण्याआधी त्याचे रिव्ह्यू वाचत असतो. दुसरे लोक त्या वस्तू विषयी काय बोलत आहेत हे बघूनच आपण ती वस्तू विकत घेत असतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे एखादा मोठा गट जे काही बोलतो त्याला आपण खरे मानतो. समाजातील रीती, धर्म नियम हे यातूनच निर्माण झाले.
तुमच्या सवयी आणि मानसिकता बनविण्यात या गटाचा सर्वात जास्त मोठा हात असतो. त्यामुळे बहुसंख्य लोकांना फॉलो करण्याआधी ही गोष्ट नक्की विश्वासपूर्ण आहे का? याचा एकदा विचार करत जा.
३) मान्यवरांचे अनुकरण - आपल्या कलाकारांचे किंवा मोठ्या लोकांचे सर्वात जास्त आकर्षण असते. त्यांच्यासारखाच मान, प्रतिष्ठा आणि पैसा आपल्याला मिळावा असे आपल्याला वाटते. त्यासाठी आपण नकळतपणे अशा लोकांचे अनुकरण करत जातो. त्यानंतर सर्वात मोठा मुद्दा तर हा असतो की मोठ्या कंपन्या या सेलिब्रिटीला आपल्या जाहिराती मध्ये घेतात. याचे कारण एकच असते की त्यांना अनेक लोक फॉलो करत असतात.
तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटी ला आदर्श मानत असाल तर ही गोष्ट चांगली देखील आहे आणि वाईट देखील. हे सर्व काही तुम्ही कोणाला आदर्श मानतात यावर अवलंबून आहे.
यशस्वी लोकांचे अनुकरण करणे आणि त्यांच्या सवयी फॉलो करणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र तुम्ही जर नकारात्मक भूमिका असणाऱ्या कलाकारांना तुमचे आदर्श मानत असाल तर तुमच्या सवयी देखील नकारात्मक असतील.
त्यामुळे चांगल्या सवयीसाठी तुमची निवड देखील चांगलीच असायला हवी.
या तिन्ही घटकांकडून तुम्ही सवयी घेतात. याच सर्व सवयी तुम्हाला तुमचे भविष्य घडविण्यासाठी मदत करतात. तुम्ही कोणासोबत आपला वेळ घालवता हे देखील महत्वाचे असते.
तुमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य हे काय तुम्हाला बदलता येणार नाहीत. मग यावर पर्याय काय तर, तुम्हाला आवडत्या त्या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींना सोशल मीडियावर फॉलो करायला सुरुवात करा. तुम्हाला ज्ञान मिळवून देणारे आणि विकसित होण्यासाठी मदत करनारे फेसबुक पेजेस, इन्स्टाग्राम पेजेस आणि युट्युब चॅनल देखील फॉलो करा. याचा फायदा असा होतो की तुम्ही ऑनलाइन का होईना पण चांगल्या लोकांसोबत कनेक्ट होतात.