ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया पॉलिसी 2022 ।। Green Hydrogen & Green Ammonia Policy 2022 Explained in Marathi
भारत सरकारने गुरुवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी 2022 रोजी ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजन पॉलिसी आणली आहे. या पॉलिसी चा उद्देश हा 2030 पर्यंत ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन 50 टनांपर्यंत वाढविणे हा आहे. ग्रीन हायड्रोजन पॉलिसीचा फायदा असा होईल की भारत स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणारे एक मोठे केंद्र बनू शकेल. सरकारने हा निर्णय घेतला आणि या क्षेत्राशी निगडित सर्व कंपन्यांचे शेअर्स वधारलेले आपल्याला बघायला मिळाले.
आपल्याला भविष्यात स्वच्छ इंधन म्हणजेच ग्रीन हायड्रोजन हा पर्याय जास्तीत जास्त वापरात बघायला मिळेल यात काही शंका नाही. आज आपण ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया पॉलिसी विषयी जाणून घेणार आहोत. या पॉलिसी मध्ये नेमकं काय आहे, ग्रीन हायड्रोजन म्हणजे नक्की काय, ग्रीन हायड्रोजन कुठे मिळतो किंवा कसा बनवतात, या क्षेत्रातील कंपन्या कोणत्या आहेत आणि तुम्हाला याचा काय फायदा होईल याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
सर्वात आधी आपण ही पॉलिसी काय आहे याविषयी जाणून घेऊयात.
Green Hydrogen Policy 2022 In Marathi
न्यू पॉलिसी नुसार नवीन रिन्यूएबल एनर्जीचा प्लांट जर कोणी जुलै 2025 आधी सेटअप केला आणि या प्लांट मधून जर ग्रीन हायड्रोजन प्रोडक्शन साठी पॉवर सप्लाय होत असेल तर पॉवर ट्रान्समिशन चे पैसे पुढील 25 वर्ष त्या कंपनीला द्यावे लागनार नाही.
हे काहीसं अवघड अवघड आहे मात्र उदाहरण दिल्यावर लगेच समजेल. समजा मी ग्रीन हायड्रोजनचा उत्पादक आहे आणि माझी त्या संदर्भात एक कंपनी आहे. माझा प्लांट हा गुजरात राज्यात आहे. माझ्या प्लांट मध्ये ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन घेण्यासाठी मला विजेची गरज असेल हे जगजाहीर आहे. ही वीज निर्माण करण्यासाठी जर मी खानदेश मध्ये सोलर प्लांट टाकला आणि त्यातून निर्माण होणारी वीज मी गुजरात मध्ये माझ्या प्लांट ला घेऊन गेलो. आता मी वीज महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात घेऊन जात आहे आणि त्यामुळे मला तसे बघायला गेलं तर आंतरराज्य वीज वाहतूक खर्च हा द्यावा लागणार आहे. मात्र या धोरणानुसार मला पुढील 25 वर्ष कोणत्याही प्रकारे हा कर द्यावा लागणार नाही.
सरकारच्या या ग्रीन हायड्रोजन धोरणामुळे ज्या तेल कंपन्या, खत निर्मिती कंपन्या किंवा ज्या स्टील प्रोडक्शन मध्ये कंपन्या आहेत त्यांना फायदा होणार आहे. या सर्व क्षेत्रातील कंपन्यांना हायड्रोजन आणि अमोनिया हा पुढील उत्पादनासाठी लागत असतो. आता या कंपन्यांना हे सर्व परवडणार आहे. कारण आता ते स्वतःचा ग्रीन हायड्रोजन किंवा ग्रीन अमोनिया प्लांट सुरू करू शकतील. त्यांना इंटर स्टेट ट्रान्समिशन चार्ज न लागल्याने त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल.
सध्या या कंपन्या ग्रे हायड्रोजन किंवा ग्रे अमोनिया उत्पादनासाठी वापरतात. या ग्रे हायड्रोजन किंवा ग्रे अमोनियाची निर्मिती नॅचरल गॅस किंवा नॅफता पासून केली जाते.
ग्रीन हायड्रोजन नक्की काय आहे? (What is Green Hydrogen in Marathi?)
पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर त्यापासून जो हायड्रोजन गॅस बाहेर येईल त्याला ग्रीन हायड्रोजन असे म्हणतात. इलेक्ट्रोलिसिस मध्ये पाण्यापासून म्हणजेच H2O पासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही वेगवेगळे केले जातात.
हायड्रोजनचे इतर प्रकार (Other Types of Hydrogen)
ग्रीन हायड्रोजन सोबत ब्लॅक, ब्राऊन, ग्रे, ब्ल्यू हे देखील हायड्रोजन आहेत. हायड्रोजनचे उत्पादन कसे होते यानुसार त्याचा रंग ठरत असतो.
ग्रे हायड्रोजनचे उत्पादन हे नॅचरल गॅस किंवा मिथेन पासून होते. त्यासाठी स्टीम रिफायनिंग प्रोसेस वापरली जाते. ब्लॅक आणि ब्राऊन हायड्रोजनचा वापर हा फार कमी प्रमाणात केला जातो कारण हा पर्यावरणासाठी सर्वात जास्त धोकादायक आहे. ब्लॅक आणि ब्राऊन हायड्रोजन निर्मिती करत असताना मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड निर्मिती होत असते.
ग्रीन हायड्रोजन कडे भविष्य म्हणून बघितले जाते कारण हा पर्यावरण पूरक आहे. ग्रीन हायड्रोजन हा एक शाश्वत इंधन पर्याय आहे.
आपल्याकडे क्रूड ऑइल, सोलार प्लांट, अणू ऊर्जा बनवत आहोत तर मग ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया यांची गरज काय आहे?
गेल्या काही काळापासून ग्लोबल वॉर्मिंग या पर्यावरणासाठी सर्वात मोठ्या असलेल्या समस्येची सर्वदूर चर्चा सुरू आहे. प्रत्येक देश आता कमीत कमी कार्बन उत्सर्जन कसे होईल यासाठी काही टार्गेट बनवतो आहे. ग्रीन हायड्रोजन मुळे आता कमीत कमी कार्बन उत्सर्जन होईल आणि जास्तीत जास्त एनर्जी निर्मिती देखील होईल. पुढे येणाऱ्या काळात बदलत आणि सुधारत चालणाऱ्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत ही ऊर्जा मिळविणे अधिक सोपे होत जाणार आहे.
या क्षेत्रात स्पर्धा आहे मात्र सरकार मदत देखील करते आहे. तज्ञ लोक सांगत आहेत की येणाऱ्या काळात ग्रीन एनर्जी सेक्टर मध्ये पुढील काळात एक मोठा बुम होऊ शकतो. त्यामुळेच ग्रीन हायड्रोजन निगडित स्टॉक बाजारात चर्चेत आहेत. हे स्टॉक बाजारात सध्या तेजीत आहेत.
ग्रीन हायड्रोजनचा उपयोग
आपण सध्या ज्या ठिकाणी इंधन वापरतो आहे त्या प्रत्येक ठिकाणी ग्रीन हायड्रोजन वापरता येणार आहे.
ग्रीन हायड्रोजन क्षेत्रातील कंपन्यांची नावे (Green Hydrogen Related Stocks & Companies)
रिलायन्स (Reliance) - मुकेश अंबानी यांनी या क्षेत्रात 75 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रीन हायड्रोजन ही त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट आहे. येत्या दशकात 1 डॉलर प्रति किलो दराने हा हायड्रोजन गॅस सप्लाय करण्याचे महत्वकांक्षी उद्दिष्ट ठेवलेले आहे. येत्या काळात रिलायन्स समूह या ग्रीन हायड्रोजनचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देखील बनू इच्छितो आहे.
गेल (GAIL) - गेल चा भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लांट एका वर्षात सुरू होणार आहे. कंपनीने या संदर्भांत आधीच सुरुवात केलेली आहे. यांचे उद्दिष्ट हे 4.5 टन प्रति दिवस ग्रीन हायड्रोजन गॅस निर्मिती करणे हे असेल.
इंडियन ऑइल (Indian Oil) - मथुरा रिफायनरी मध्ये इंडियन ऑइल त्यांचा पहिला प्लांट सुरू करते आहे. 100 कोटी रकमेच्या कोची आणि तिरूअनंतपुरम येथील पायलट प्रोजेक्टसाठी देखील सरकारने त्यांना मान्यता दिलेली आहे.
एनटिपीसी (NTPC) - आंध्र प्रदेश राज्यात त्यांनी त्यांचा ग्रीन हायड्रोजन मायक्रोप्रोजेक्ट आधीच सुरू केलेला आहे. येणाऱ्या काळात लेह लडाख येथे ग्रीन हायड्रोजन फ्युएल स्टेशन उभारण्याची ईर्षा त्यांनी दाखवलेली आहे.
एल अँड टी (L&T)
अदानी (adani) - अदानी यांनी देखील 20 बिलियन डॉलर इन्व्हेस्टमेंट प्लॅन ग्रीन हायड्रोजन संदर्भात केलेला आहे. याना देखील जगातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादक आणि ग्रीन हायड्रोजन पुरवठादार बनायचे आहे.
शेअर मार्केट मध्ये हे स्टॉक सध्या वधारले आहेत. तुम्हाला देखील गुंतवणूक करायची असेल तर एकदा रिसर्च करा आणि तज्ञांचा सल्ला घेऊन या क्षेत्राशी निगडित स्टोक मध्ये गुंतवणूक करा. पुढील काळात या क्षेत्रात बुम असणार आहे हे मात्र नक्की!