श्रीमानयोगी पुस्तक परीक्षण ।। Shreemanyogi Book Review Marathi
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंतयोगी!
स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजायला गुलामगिरीचा अनुभव यावा लागतो असे म्हणतात. गुलामगिरीचा अनुभव हा मरणापेक्षाही भयंकर समजला जातो. म्हणजेच गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळविणे हे मरणानंतर जिवंत होण्याइतके कठीण असते. परंतु काही इतिहासपुरुष असे असतात जे गुलामगिरीला घोड्याच्या टापांखाली उधळून लावतात. गुलामगिरीतून आपल्या मातृभूमीला मुक्त करून आपल्या मातृभूमीला ते एक नवा पुनर्जन्म देत असतात.
हे काम मात्र सोपे नसते. मेलेला स्वाभिमान जागा करायला मेलेल्या मनांवर फुंकर घालावी लागते. पण एक योग्या ने, महापुरुषाने फक्त मनावर फुंकर घालायचे काम न करता करोडो मनांवर अधिराज्य गाजविले आणि स्वराज्याचा जरीफटका डौलाने फडकविण्यास बळ दिले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित श्रीमानयोगी पुस्तकाचा रिव्ह्यू (Shreemanyogi Book Review Marathi) या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
पुस्तकाचे नाव - श्रीमानयोगी
लेखकाचे नाव - रणजित देसाई
पब्लिशरचे नाव - मेहता पब्लिशिंग हाऊस
दीप- 9/10
छत्रपती शिवराय हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी गुलामगिरीत असताना स्वातंत्र्य कसे मिळवायचे आणि ते टिकून कसे ठेवायचे हे शिकविले आहे. छत्रपती शिवरायांविषयी रणजित देसाई लिखित श्रीमानयोगी या कादंबरीचे आज आपण समीक्षण करत आहोत.
19 फेब्रुवारी 1630… सारा आसमंत त्या क्षणाची वाट बघत होता. आजूबाजूच्या जनतेला याविषयी जाणीव नसावी मात्र निसर्गाला या अदृश्य शक्तीच्या येण्याची चाहूल मात्र लागलेली होती. एक शककर्ता राजा जन्माला येणार होता. एक असा मातीतला राजा जो आपल्या मायभूमीला स्वतंत्र करेल, शेकडो वर्षे पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत असलेल्या महाराष्ट्र देशाला मुक्त करेल आणि क्रांतीची नवी मशाल घराघरात पेटवेल. अखेर तो क्षण आलाच! शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला.
शिवाई देवीच्या कृपाशीर्वादाने त्यांचा जन्म झाला म्हणून नाव शिवाजी ठेवण्यात आले. या नावातील लपलेला अर्थ त्यावेळेस महाराष्ट्राला कळला नाही. शिवाजी हे नाव आपण जर उलटे वाचले तर हे नाव जीवाशी असे होते. याचाच अर्थ जो जीवाशी खेळतो तो शिवाजी!
जिजाऊ माँसाहेबांच्या संस्काराखाली तो तेजस्वी अंकुर वाढत जातो. लहानपणापासून आपल्या सख्या सवंगड्याना साथीस घेऊन रोहिडेश्वरी स्वराज्याची शपथ घेतो. काय देखणे रूप असेल ते नाही….
महाराजांचे ते धाराष्ट्य रक्त जेव्हा त्या शंकराच्या पिंडीवर पडले असेल तेव्हा ती पिंडी देखील शहारली असेल. एका शिवाने दुसऱ्या शिवाला भरभरून आशीर्वाद दिले असतील. तेव्हाच देवदेवतांच्या कृपादृष्टीत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली असेल.
लेखक रणजित देसाई यांची कादंबरी श्रीमानयोगी ही स्वराज्य निर्मितीच्या हेतुइतकीच शुद्ध आहे. या कादंबरीची पहिली आवृत्ती 1946 साली प्रसिद्ध झाली. कादंबरीचे मुखपृष्ठ उलगडल्यानंतर भगव्या रंगात रेखीवपणे श्रीमानयोगी असे लिहिलेले आहे. त्याच्या आतील बाजूस लेखकाचे नाव देखील तसेच लिहिलेले आहे. मागे शिवरायांची राजमुद्रा आणि खाली तिचा अर्थ देखील भगव्या रंगात कोरलेली आहे.
लेखक रणजित देसाई यांनी ही कादंबरी पुतळाराणीसाहेब यांना समर्पित केलेली आहे. हे समर्पण त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले आहे त्यामुळे ते भावशुद्ध आहे.
वरकरणी बघता पुस्तक जाड वाटते, म्हणजे ते आहेच. पुस्तकाला 1147 पाने आहेत. पण शिवाजी महाराज हा सगळ्यांच्या आवडीचा विषय असल्याने काही लोक हे पुस्तक एका बैठकीत संपवू शकता. पुस्तकांच्या शेवटी काही किल्ल्यांचे नकाशे आहेत. हे नकाशे इतिहास समजून घेण्यास उपयुक्त ठरतात. लेखकाची भाषा ओघवती आहे. ती कुठेच खंडित होत नाही. अनेक घटनाप्रसंग त्यांनी एकात एक गुंतवून त्यात जिवंतपणा टिकवून ठेवलेला आहे.
कादंबरीत काही उर्दू, फारसी शब्द देखील समाविष्ठ आहेत. परंतु ते समजनारच नाही असे देखील नाहीत. वाचकाला कळण्याइतका त्याचा अर्थ सोप्पा आहे. यामध्ये काही शब्द शिवकालीन आहेत मात्र आपल्याला आताचे अपभ्रंश झालेले आणि तेव्हाचे शब्द सहज समजतात. काही पुरावे देताना त्यांनी इतिहास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतलेले दिसते.
शिवरायांच्या इतिहासातील अनेक प्रसंगांवर इतिहासकारांचे दुमत आहेत. आपल्याला या पुस्तकात रणजित देसाई यांनी दोन्ही मते स्वीकारलेली आहेत. आपल्याला पात्र तर जिवंत साकारलेली आढळतात आणि त्यासोबत गड, किल्ले, मार्ग आणि गावे आपल्या लेखणीतून खुलवलेली आहेत. अफजलखान वधाचा प्रसंग तुम्ही पुस्तकात वाचाल तेव्हा तुम्हाला हे प्रकर्षाने जाणवेल. नायक मोठा करायचा म्हणजे खलनायक मोठा साकारावा लागतो असे म्हणतात. हेच सर्व रणजित देसाई यांनी उत्तम साकारले आहे.
उदाहरण द्यायचे झाल्याचं अफजलखान, आदिलशहा, मिरझाराजे, औरंगजेब यांना त्यांनी गरजेइतकेच तारतम्य बाळगून मोठ केलेले आहे.
कादंबरीत चित्रे जरी नसली तरी देखील भाषाशैली ते प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे करते.
पुस्तकाचे शीर्षक महाराजांचे व्यक्तिमत्व दोन शब्दात मांडणारे आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ रवी मुकुल यांनी साकारलेले असून ते कमाल दिसते. दैदिप्यमान इतिहासाचा तो पुरुष मुखपृष्ठावर शोभून दिसतो. पुस्तकातील अक्षरांची लांबी आणि जाडी योग्य असून दीर्घकाळ वाचावे लागेल या हिशोबाने या पुस्तकाची जोडणी केलेली आहे. पुस्तकाची प्रस्तावना देखील वाचणीय आहे. भाषा इतिहासकालीन मात्र संवादात्मक असल्याने आपण समजून घेऊन एखाद्या विशिष्ट परिस्थितीत पटकन गुंततो. आपण त्या इतिहासाचा पटकन भाग बनतो.
वाचक तो इतिहास त्या काळात जाऊन अनुभवतो आहे असे त्याला वाटते. हेच त्या लेखकाचे सर्वात मोठे यश आहे.
तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराज आणि त्यांच्या आयुष्यातील प्रसंग समजून घ्यायला मदत होईल. मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रकाशित हे पुस्तक आहे.
दीपस्तंभ श्रीमानयोगी या पुस्तकाला 10 पैकी 9 दीप देत आहेत.