उधळणारा घोडा - गजानन महाराजांच्या कथा || Udhalanara Ghoda Marathi Katha
एक दिवस शेगाव येथे गोविंद बुवा टाकळीकर नावाचे एक कीर्तनकार किर्तनासाठी आले होते. रात्रीचा प्रहर होता. रात्रीच्या वेळेला शेगावात गोविंद बुवा दाखल झाले.
एका शिव मंदिरात ते मुक्कामाला थांबले. रात्री त्यांनी त्यांचा घोडा एका झाडाला बांधला. टाकळीकर महाराजांचा घोडा हा थोडा द्वाड होता. एके ठिकाणी तो स्थिर राहत नव्हता. सारखा तो लाथा झाडायचा किंवा खिंकाळायचा.
बुवांनी घोड्याला बांधले खरे मात्र काळजीपोटी ते घोड्याकडे थोड्या वेळानंतर लक्ष देत होते. काही वेळानंतर त्यांनी घोड्याकडे पाहिले तेव्हा घोडा शांत झालेला होता.
घोड्याला शांत बघून गोविंद बुवांना आश्चर्य वाटले. ते घोड्याजवळ आले. घोड्याजवळ येताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी पाहिले की त्या द्वाड घोड्याच्या चार पायांमध्ये गजानन महाराज निद्रिस्त होते. महाराजांच्या मुखातून गण गण गणात बोते हे बोल सुरूच होते.
महाराजांचे भजन ऐकत घोडा देखील शांत उभा होता. महाराजांच्या दैवत्वाचा गोविंद बुवांना साक्षात्कार झाला. त्यांनी महाराजांच्या समोर आपले मस्तक टेकविले.
महाराजांना गोविंद बुवा म्हणाले, "महाराज आपण या द्वाड घोड्याचा खट्याळपणा घालविला. आपण धन्य आहात!"
महाराज घोड्याला म्हणाले, "गड्या तुझा उथळपणा इथेच सोडून दे. कोणालाही त्रास देऊ नकोस." असे बोलून महाराज तिथून निघून गेले.
सकाळी ही गोष्ट जेव्हा सगळ्यांना समजली तेव्हा सर्व लोक महाराजांच्या समोर नतमस्तक झाले.
गजानन महाराज की जय!