ब्रम्हगिरी गोसावी - गजानन महाराजांच्या कथा | Bramhagiri Gosavi Marathi Katha
शेगाव मध्ये बरेच दिवस वास्तव्य केल्यानंतर गजानन महाराज कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात राहण्यासाठी गेले. महाराज कृष्णाजीला म्हणाले, "कृष्णा, हा शंभू तुझ्या मळ्यात रमला आहे. म्हणलं मी ही रहावं त्याच्या सोबतीने."
कृष्णाजी म्हणाला, "आपण हवे तितके दिवस इथे राहावे."
महाराज म्हणाले, "मग करून दे या ओट्यावर थोडी सावली."
कृष्णाजी म्हणाला, "हो, हो, आत्ताच करून देतो."
कृष्णाजीने ताबडतोब पत्रे आणली. त्या ओट्यावर त्याने छप्पर बनवून दिले. महाराज त्या मळ्यात राहू लागले.
तिथे ब्रम्हगिरी नावाचा एक गोसावी काही दिवसांनी त्याच्या शिष्यांसोबत आला. त्यातील एक शिष्य कृष्णाजीला म्हणाला की ,"आम्ही ब्रम्हगिरी गोसाव्याचे शिष्य आहोत. अनेक तिर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन आम्ही रामेश्वराला जात आहोत."
यावर कृष्णांजी म्हणाला, "ठीक आहे, मी आपली काय सेवा करू शकतो?"
यावर तो शिष्य म्हणाला की, "आम्ही इथे 3 दिवस राहू. त्यामुळे या संधीचा लाभ घे. आम्हाला सगळ्यांसाठी शिरा पुरीचे जेवण आणि गांजा ओढण्याची तजवीज कर."
कृष्णाजी यावर म्हणाला, "ठीक आहे. शिरा पुरीचे जेवण उद्या करेल. आज पिठलं भाकरी तयार आहे, ती खाऊन घ्यावी. आणि गांजाही तिथेच ओढावा."
गोसाव्याचे शिष्य पिठलं भाकरी एका विहिरीजवळ बसून खाऊ लागले. काही वेळानंतर ब्रम्हगिरी गोसाव्याने गीतेचे पठण करण्यास सुरुवात केली. गजानन महाराज पत्र्याच्या छप्परा खाली खाटेवर बसलेले होते. काही मंडळी देखील ब्रम्हगिरीचे पठण ऐकण्यास बसली.
गीतेतील नैनम छिंदंती या श्लोकावर ब्रम्हगिरी निरूपण करु लागले. ब्रम्हगिरी हा दांभिक होता. गजानन महाराज खाटेवर बसून हे सर्व बघत होते. निरूपण संपल्यावर सर्व मंडळी गजानन महाराजांच्या जवळ आली. त्यांच्याजवळ भास्कर पाटील उभा होता.
महाराज त्याला म्हणाले, "भास्करा, जरा चिलीम पेटवून दे."
भास्कराने चिलीम पेटवून दिली. नकळत एक थिणगी खाटेवर पडली. ती थिणगी कोणालाच दिसली नाही. थिणगीने खाटेवरील चादरी पेटली. हळूहळू खाटेने सुद्धा पेट घेतला. सर्व पळू लागले.
भास्कर देखील पाणी आणायला जाऊ लागला. महाराज त्याला थांबवत म्हणाले, "भास्करा, पाणी आणू नको."
ब्रह्मगिरी कडे बघत गजानन महाराज म्हणाले, "महाराज, या जरा बसा या जळत्या खाटेवर! आणि नैनम दाहती पावकहा, हे सिद्ध करून दाखवा. गीता तोंडपाठ असलेले तुम्ही पवित्र असलाच ना? "
हे ऐकून ब्रम्हगिरी घाबरला आणि तो टाळाटाळ करू लागला. भास्कर पाटलाने त्याला ओढत महाराजांच्या समोर आणून उभे केले. त्यावेळी ब्रम्हगिरी गोसावी पूर्ण बिथरला. तो गयावया करत म्हणू लागला, "महाराज, मी पोटभरू गोसावी आहे. चांगलं चुंगल खाण्यासाठी हे ढोंग करतो, मला क्षमा करा."
महाराजांनी त्यांना माफ केले. त्यांना उपदेश केला. हा उपदेश ऐकून ब्रम्हगिरी सर्वार्थाने त्यागी होऊन निघून गेला.
गजानन महाराज की जय