झाडाचा मालक कोण? | Who is the Owner of tree? |Akbar Birbal marathi story
एकेदिवशी बादशहा अकबर हे दरबारात बसून त्यांच्या प्रजेच्या समस्या ऐकून घेत होते. सर्व लोक त्यांच्या त्यांच्या समस्या घेऊन बादशहाच्या समोर येत होते. त्यात राकेश आणि महेश नावाचे दोन शेजारी त्यांची समस्या घेऊन बादशहाकडे आले.
या दोघांच्या भांडणाचे कारण होते त्यांच्या घरांच्या अगदी मधोमध असलेले आंब्याचे झाड! समस्या ही होती की आंब्याच्या झाडाचा मालक कोण आहे? राकेश म्हणत होता की ते झाड त्याचे आहे तर महेश देखील बोलत होता की ते झाड त्याचे आहे. महेश असे म्हणत होता की तो त्या झाडाचा खरा मालक असून राकेश खोटं बोलत आहे.
झाड एक आणि मालक दोन! हे प्रकरण सोडवणे सोप्पे नव्हते आणि दोघांपैकी एकही व्यक्ती माघार घ्यायला तयार नव्हता. दोन्ही बाजूकडून म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि काही वेळ विचार केल्यानंतर बादशहा अकबर याने त्याच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या बिरबल याच्याकडे सोपविला.
हा प्रश्न सोडवण्यासाठी बिरबलाने एक नाटक केले. त्याने दोन शिपायांना सांगितले की संध्याकाळी राकेश च्या घरी जा आणि त्याला सांगा की त्याच्या आंब्याच्या झाडावरून आंबे चोरी होत आहेत. बिरबलाने इतर दोन शिपायांना देखील महेश च्या घरी पाठवले व हाच संदेश द्यायला सांगितले. हा संदेश दिल्यानंतर त्या शिपायांना त्या दोघांच्या घराच्या पाठीमागे लपून ते दोघे काय करतात हे बघायला सांगितले. यासोबत बिरबलाने हे देखील सांगितले की राकेश आणि महेश या दोघांना ही गोष्ट कळता कामा नये की तुम्ही त्यांच्या आंब्याच्या चोरीविषयी संदेश घेऊन आले आहात.
शिपायांनी तसेच केले जसे बिरबलाने सांगितले होते. दोन शिपाई राकेशच्या घरी गेले व दोन शिपाई महेशच्या घरी गेले. त्यांनी तिथे बघितले तर तिथे घरात राकेश आणि महेश दोघेही नव्हते. शिपायांनी त्यांच्या पत्नीला हा संदेश देऊन टाकला. जेव्हा महेश घरी आला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला आंब्याच्या चोरीविषयी माहिती दिली. हे ऐकून महेश बोलला की "कमीत कमी जेवायला तरी दे, या आंब्याच्या नादात काय उपाशीच राहू! काय ते झाड कुठे आपले आहे, चोरी होत आहे तर होऊ दे. सकाळी बघू."
असे बोलून ते आरामात जेवण करायला लागला. जेव्हा राकेश घरी आला आणि त्याच्या पत्नीने त्याला ही सूचना सांगितली तेव्हा तो झाडाकडे गेला. त्याच्या पत्नीने त्याला आवाज दिला की "अहो, जेवण तर करून घ्या" यावर राकेश बोलला, "जेवण तर मी सकाळी देखील करू शकतो परंतु जर आज आंबे चोरीला गेले तर माझ्या मेहनतीवर पाणी फिरेल!"
शिपायांनी दोघांच्या घरामागे लपून हे सर्व काही ऐकले. त्यांनी ते सर्व बिरबलाला सांगितले. राकेश आणि महेश दुसऱ्या दिवशी दरबारात आले. बिरबलाने त्या दोघांच्या समोर बादशहा ला सांगितले की "जहाँपणा, सर्व काही समस्यांच मूळ हे ते झाड आहे. आपण ते झाडच कापून टाकूयात. ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी!"
बादशहा ने याविषयी राकेश आणि महेश यांना विचारले तेव्हा महेश म्हणाला, "बादशहा, तुमची हुकूमत आहे. तुम्ही जे काही म्हणाल ते मला मान्य आहे." यावर राकेश बोलला की "बादशहा, मी 7 वर्षांपर्यंत त्या झाडाची काळजी घेतली आहे. तुम्हाला वाटले तर ते झाड तुम्ही महेशला द्या परंतु कृपया त्या झाडाला तोडू नका. मी तुमच्यासमोर हात जोडून ही विनंती करतो."
त्या दोघांचे बोलणे ऐकून बादशहाने बिरबलाकडे बघितले आणि ते म्हणाले "आता तुमचे काय म्हणणे आहे बिरबल?" बिरबलाने बादशहाला काल रात्री घडलेली गोष्ट सांगितली व बिरबल हसत म्हणाला की "हुजूर, झाड एक व मालक दोन, असे कसे घडू शकते? काल रात्री झालेल्या घटनेने आणि आज इथे झालेल्या घटनेने हे समोर येते आहे की राकेश हाच झाडाचा खरा मालक आहे. महेश खोटे बोलतो आहे."
बादशहाने बिरबलाला शाबासकी दिली. राकेश ला त्यांनी झाडाची मालकी दिली व त्याने हक्कासाठी लढल्याबद्दल त्याची प्रशंसा देखील केली. महेशला बादशहाने खोटं बोलणे व चोरी करण्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली.
शिकवण: गोष्टीमधून आपण काय शिकलो?
कष्ट केल्याशिवाय कपटाने एखाद्याची वस्तू चोरी केल्याने त्याचा शेवट हा वाईटच होत असतो.