सातारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती || Satara District Information in Marathi
सातारा जिल्हा म्हणजे भटक्यांचे आणि पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण! सह्याद्रीच्या डोंगररांगा, प्राचीन मंदिरे, किल्ले आणि थंड हवेची ठिकाणे यांनी सातारा जिल्ह्याला समृद्ध बनवले आहे. सातारा हे ठिकाण पुणे शहरपासून 110 किलोमीटर, कोल्हापूर शहरापासून 121 किलोमीटर तर मुंबई पासून 256 किलोमीटर आहे.
सातारा जिल्ह्यातून कृष्णामाई आणि कोयना या दोन प्रमुख नद्या वाहतात. सातारा हे शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगाच्या अगदी मधोमध वसलेले हे शहर, त्यामुळे या शहराला नाव मिळाले सातारा! इतिहासात महत्व असणाऱ्या सातारा शहरात आजही महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे सातारा शहरात वास्तव्य आहे.
सातारा जिल्ह्यातील गडकिल्ले- Forts in Satara District
अजिंक्यतारा-
सातारा शहरात प्रवेश केल्यावर पवई नाक्यावरून डाव्या बाजूच्या रस्त्याने यवतेश्वर घाट मार्गे अजिंक्यतारा किल्ल्यावर जाता येते. किल्ल्यावर मारुती मंदिर, महादेवाचे मंदिर, मंगळादेवीचे मंदिर, ताराराणी यांच्या वाड्याचे अवशेष, प्रसारभारती चे कार्यालय आणि पाण्याची काही टाकी आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावरून आपल्याला सातारा शहराचे विहंगम दृश्य बघायला मिळते. मराठी साम्राज्याला रक्षणकर्ता म्हणून अनेक शतके अजिंक्यताऱ्याने मदत केली.
इतिहासाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याला खूप जास्त महत्व आहे. मराठा साम्राज्याची सातारा ही चौथी राजधानी होती. सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा हा किल्ला राजधानीचे ठिकाण होते.
बारा मोटांची विहीर-
सातारा शहरापासून काही अंतरावर काळ्या पाषाणात बांधलेली 12 मोटांची विहीर आहे. ही विहीर शेरीलिंब या गावात आहे. विहिरीचा घेर हा 50 फूट तर खोली 110 फूट आहे. या विहिरीचा वापर भोवताली पाण्यासाठी आणि जवळपास 3000 आंब्याच्या झाडांच्या पाण्याची व्यवस्था म्हणून केला जात असे. या विहिरीला पाणी उपसण्यासाठी एका वेळी 12 मोटा लावत असत आणि त्यामुळेच याला 12 मोटांची विहीर असे म्हणले जाते. या विहिरीचे बांधकाम इस 1719 ते 1724 यादरम्यान शाहू महाराजांच्या पत्नी बिरुबाई भोसले यांनी बांधलेली असावी असा अंदाज आहे.
विहिरीचा आकार हा अष्टकोनी आहे. विहिरीमध्ये एक सुंदर महाल आहे. या महालाच्या खांबांवर सुंदर असे नक्षीकाम केलेलं आहे. येथे दगडी सिंहासन आणि दोन चोरदारवाजे आहेत.
सज्जनगड-
शिलाहार राजा भोजने हा किल्ला बांधला. शिवरायांच्या अखत्यारीत हा किल्ला होता. समर्थ रामदासांनी उतारवयात या किल्ल्यावर वास्तव्य केले. इथे रामाचे मंदिर आहे. महाराजांनी रामदास स्वामींना भेट दिलेला पलंग, रामदास स्वामींची समाधी, छत्रपती शिवरायांनी भेट दिलेली कुबडी मध्ये लपविता येईल अशी तलवार (गुप्ती) आणि इतर वस्तू आपल्याला गडावर बघावयास मिळतात.
प्रतापगड-
महाराजांनी बांधलेला हा प्रतापगड किल्ला! महाराजांनी याच प्रतापगडावर खानाचा कोथळा बाहेर काढला आणि शिवप्रताप केला! प्रतापगडाचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहेच. किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर, केदारेश्वराचे मंदिर, स्फटिकाचे शिवलिंग, पाण्याची टाकी, मजबूत तटबंदी, यशवंत बुरुज, सूर्य बुरुज, शिवप्रताप बुरुज,तोफा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या गोष्टी बघायला मिळतात.
सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- Tourist Places in Satara District
कास पठार-
पावसाळा सुरू झाला की असंख्य अशी रानफुले इथे फुलतात. युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठाराचा समावेश झाला. पठारावर रानफुले, वेली, झुडपे, यांच्या अतिशय दुर्मिळ अशा 850 प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान आपण या ठिकाणी भेट देऊ शकतो.
ठोसेघर धबधबा-
तारळी नदी पात्रातून 600 फूट उंचीवरून कोसळणारा हा ठोसेघर धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. पावसाळ्यात आपल्याला या धबधब्याचे संथ आणि तांडव हे दोन्ही रूपे बघायला मिळातात.
बामणोली-
निसर्गरम्य परिसर आणि बोट क्लब
चाळकेवाडी-
पवन विद्युतनिर्मिती प्रकल्प (आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे), चास पठारप्रमाणेच इथही रानफुले फुलतात.
प्रीतिसंगम-
कोयना आणि कृष्णा या नद्या एकत्र येतात त्या ठिकाणाला प्रीतिसंगम असे म्हणतात. इथे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. सभोवतालच्या परिसरात आता बाग विकसित करण्यात आलेली आहे.
वाई-
अनेक प्राचीन मंदिरे आणि प्रशस्त घाट इथे आहेत. याला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. इथे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे.
महाबळेश्वर-
थंड हवेचे ठिकाण आहे. ब्रिटिश राजवटीत महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणांचा विकास झाला. मुंबई प्रांतातील उन्हाळाच्या दिवसात महाबळेश्वर ही राजधानी असे. लॉर्ड विक पॉईंट, विल्सन पॉईंट, एल्फिस्टन पॉईंट, अर्थर सिंट पॉईंट आणि वेण्णा लेक हे बघण्यासारखे आहेत.
तापोळा- कोयना जलाशयातील शिवसागरात असलेला शेवटचा परिसर म्हणजे तापोळा होय. इथे देखील बोटिंग ची व्यवस्था आहे.
श्री क्षेत्र महाबळेश्वर-
महाबळेश्वर चे प्रसिद्ध मंदिर आहे. यादव राजांनी या मंदिराची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
पंचगंगा मंदिर-
या ठिकाणापासून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या नद्या उगम पावतात.
सातारा शहरातील धरणे - Dams in Satara District
कण्हेर धरण-
वेण्णा नदीवरील या धरणाचा जलाशय पर्यटकांना आकर्षित करतो.
धोम धरण-
कृष्णा नदीवर हे धरण आहे. बोटिंग देखील उपलब्ध आहे.
सातारा जिल्ह्यातील धार्मिक स्थळे - Temples in Satara District
मेणवली घाट-
कृष्णा नदीच्या काठावर भव्य असा चंद्रकोरीच्या आकारात हा घाट बांधण्यात आलेला आहे. इथे अनेक मंदिरे आहेत. त्यात मेनेश्वराचे प्राचीन मंदिर बघावयास मिळते. मेणवली येथे नाना फडणवीस यांचा मराठा शैलीत बांधलेला चारसौपी वाडा आहे.
औंध संस्थान-
येथील श्री भवानी चित्र संग्रहालय हे पाहण्यासारखे स्थळ!
यवतेश्वर मंदिर-
सातारा शहरापासून 9 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हे यादव कालीन मंदिर आहे. मंदिराशेजारी ग्रामदैवत भैरवनाथांचे मंदिर आहे. एकाच चौथऱ्यावर दोन नंदी असलेले हे एकमेव मंदिर आहे. हेमांडपंथी ही मंदिराची बांधकाम शैली आहे.
पालीचा खंडोबा-
अनेकांचे कुलदैवत असणारा हा पालीचा खंडोबा सातारा शहरापासून जवळच आहे. मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलीतील असून मंदिर 13 व्या शतकात बांधण्यात आले आहे.
चाफळ राम मंदिर-
समर्थ रामदासांनी चाफळ मध्ये दोन मारुतीची स्थापना केली. पहिला मारुती चाफळच्या राममंदिरासमोर स्थापन केला. याला दास मारुती असे म्हणतात. राम मंदिराच्या मागे प्रताप मारुती आहे.
गोंदवले-
श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र देणाऱ्या परमपूज्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांची समाधी आणि समाधी मठ इथे आहे. इथे राम मंदिर, शनी मंदिर देखील आहे.
शिखर शिंगणापूर-
भोसले घराण्याचे हे कुलदैवत! मालोजीराजे भोसले यांनी या ठिकाणी तळे बांधलेले आहे. शाहू महाराजांनी 1735 मध्ये हे मंदिर पुन्हा नव्याने बांधले होते. गुढीपाडवा या दिवसाला या ठिकाणी यात्रेला सुरुवात होते.
श्री सेवागिरी महाराज, पुसेगाव-
श्री सेवागिरी महाराज हे दत्तात्रयानाचे भक्त. त्यांची समाधी इथे आहे. सेवा हा त्यांचा वसा आजही पुढे चालवला जातो आहे.
श्री सिध्दनाथ मंदिर, म्हसवड-
10 व्या शतकात या मंदिराची हेमाडपंथी बांधकाम शैलीत निर्मिती करण्यात आली. मंदिराच्या गुहेत श्री काशी विश्वेश्वराची स्वयंभू पिंड आहे. शिवरात्रीला हे मंदिर उघडे असते अन्यथा हे शिवलिंग आपल्याला बघता येत नाही. अनेकांचे हे कुलदैवत आहे. देवी आणि सिध्दनाथ यांचा नवरात्र इथे असतो.