धुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती || Dhule District Information in Marathi
पूर्वीचा पश्चिम खानदेश म्हणजे आजचा धुळे जिल्हा! रसिका या नावाने प्राचीन काळात हा जिल्हा ओळखला जात होता. याच धुळे जिल्ह्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
धुळे जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Dhule District Geographical Information in Marathi
सातपुडा डोंगरांच्या पायथ्याशी हा जिल्हा वसलेला आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 7194 चौरस किलोमीटर इतके आहे. 2011 च्या जनगणनेच्या अनुसार येथील लोकसंख्या ही 20 लाख 50 हजार पेक्षा जास्त आहे. धुळे जिल्ह्यात साक्री, शिंदखेडा, धुळे आणि शिरपूर हे चार तालुके आहेत.
धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांग आहे. याशिवाय या जिल्ह्यात गाळणा डोंगराच्या टेकड्या आहेत. धुळे जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान हे 45 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान हे 16 डिग्री सेल्सियस असते. येथे 592 मिलीमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. जिल्ह्यात पाण्याची कमतरता असल्याने बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. इथे बागायती शेती ही फक्त 1813 हेक्टर इतकी आहे.
तापी, पांझरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या धुळे जिल्ह्यातून वाहतात. या प्रमुख नद्यांमधून आणि पांझरा व कान नद्यांवर असलेल्या अक्कलपाडा धरणांमधून जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो. धुळे जिल्ह्यात कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. एका पट्ट्यात भात शेती देखील केली जाते. रब्बी हंगामात गहू आणि हरभरा ही पिके घेतली जातात.याशिवाय ऊस, केळी, मिरची ही नगदी पिके देखील घेतली जातात.
1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार हा जिल्हा तयार झाला.
धुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे - Tourist Places in Dhule District
अहिल्यापुर-
इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली आणि जुनी ओळखली जाणारी विहीर ही शिरपूर तालुक्यातील अहिल्यापुर इथे आहे. धुळे शहरापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
बळसाने-
साक्री तालुक्यात असलेल्या बळसाने येथे हेमाडपंथी आणि बहामनी शैलीतील गुहा आणि गोदाम आहेत.
आमळी-
साक्री तालुक्यात आमळी येथे अलालदरीचा धबधबा प्रसिद्ध आहे.
अनेर धरण अभयारण्य-
शिरपूर तालुक्यातील नागेश्वत गावाजवळचा हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. अनेर नदीवर येथे धरण असून इथेच अभयारण्य देखील आहे. 83 चौरस किलोमीटर इतका या अभयारण्याचा घेर आहे. अनेक पक्षी आणि प्राणी इथे आढळतात.
इतिहासाचार्य वि का राजवाडे संशोधन मंडळ-
धुळे शहरात मध्यभागी हे संशोधन मंडळ आहे. इथे वस्तुसंग्रहालयात ऐतिहासिक दस्तऐवज देखील आहेत.
धुळे जिल्ह्यातील गडकिल्ले - Forts in Dhule District
लळींग किल्ला-
लळींग हे गाव किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. मलिक राजा फारुकी याचा या किल्ल्याशी संबंध आहे. इथे धबधबा, लांडोर बंगला ही काही आणखी प्रेक्षणीय स्थळे आहेत. या बंगल्याशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास जोडलेला आहे.
थाळनेरचा किल्ला, थाळनेर-
बादशहा अकबराने बहादुरशहा चा पराभव करून थाळनेर किल्ल्यावर ताबा मिळविला. मराठ्यांनी पुढे मोघलांकडून हा किल्ला जिंकून घेतला. या ठिकाणी होळकर आणि निंबाळकर या घराण्यांनी राज्य केले आहे.
भामेर किल्ला-
गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला तीन बाजूनी गावाला वेढतो आणि एका बाजूने गावाला तटबंदी देखील आहे.
सोनगिर किल्ला-
हा किल्ला सुवर्णगिरी या नावाने देखील ओळखला जातो. फारुकी सुलतानांच्या ताब्यात हा किल्ला सुरुवातीला होता. नंतर मोघलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांनी तो जिंकून घेतला.
धुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे - Temples in Dhule District
शिरपूरचे बालाजी मंदिर, बीजासन देवी मंदिर, नकाणे तलाव, एकविरा देवी मंदिर, नगाव चे दत्त मंदिर, पेढकाई देवी मंदिर हे धुळे जिल्ह्यात आहेत.
कपिलेश्वर मंदिर, मुडावद-
तापी आणि पांझरा नद्यांच्या संगमावर शिंदखेडा तालुक्यात मुडावद येथे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले कपिलेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
इंदवे-
साक्री तालुक्यातील तळ्याच्या काठी बांधलेले हे गाव इंदिराई देवीच्या मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे. इथे गोड पाण्याचे तळे आणि शेजारी गरम पाण्याचे तळे देखील आहे.
गंगेश्वर मंदिर,चिकसे-
साक्री तालुक्यातील चिकसे येथे हे मंदिर आहे.
बोदगाव-
प्राचीन आणि मोडकळीस आलेल्या मंदिरांसाठी साक्री तालुक्यातील हे गाव प्रसिद्ध आहे. येथे भगवान शिव शंकराचे, मारुतीचे, गणपतीचे, भवानी मातेचे मंदिर आहे. येथे बारा खांबी मंदिर देखील आहे.
कन्हैयालाल महाराज मंदिर-
आमळी येथे भगवान विष्णुचे हे मंदिर आहे.
नागपूर कोकाळे-
साक्री तालुक्यातील हे ठिकाण नागाई मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
मेथी-
शिंदखेडा तालुक्यातील मेथी हे गाव यादव राज्याच्या काळातील मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. येथील बालाजी आणि भवानी मातेचे मंदिर सर्वात महत्वाचे आहे.