सांगली जिल्ह्याची संपूर्ण माहिती || Sangli District Information in Marathi
सांगली जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Geographical Information of Sangali District in Marathi
महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 8572 चौरस किलोमीटर आहे. 2011 साली झालेल्या जनगणनेच्या अनुसार सांगली जिल्ह्याची लोकसंख्या ही 28,20,575 इतकी आहे. सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहेत. यात मिरज, तासगाव, कौठे महांकाळ, जत, विटा, आटपाडी, कडेगाव, पलूस, वाळवा आणि शिराळा यांचा समावेश आहे.
सांगली जिल्हा हा कृष्णा व वारणा नदी तर उत्तरेस महादेवाच्या डोंगरावरील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसलेला आहे.
सांगली जिल्ह्याचा इतिहास- History of Sangli District
पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानावर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. यातील मिरज हे देखील संस्थान होते.
सांगलीची हळद व येथील हळद बाजार संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. उसाचे पीक देखील जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अलीकडच्या काळात सांगली जिल्ह्याला द्राक्ष उत्पादनासाठी देखील प्रसिद्धीस आला असून मिरज आणि तासगाव तालुके द्राक्ष उत्पादन करण्यात अग्रेसर आहेत.
सांगली जिल्ह्यात अनेक थोर व्यक्तिमत्व होऊन गेले. यामध्ये स्वातंत्र्य सैनिक क्रांतिसिंह नाना पाटील, समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे, कवी व पटकथा संवाद लेखक ग दि माडगूळकर, थोर नाटककार विष्णुदास भावे, कादंबरीकार व लेखक विष्णुदास सखाराम खांडेकर, लेखक आणि चित्रकार व्यंकटेश माडगूळकर, मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता गायक व नाट्यनिर्माते नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, थोर नाटककार गोविंद बल्लाळ देवल, दादासाहेब वेलणकर, कादंबरीकार ना स इनामदार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, भारतीय क्रिकेटपटू विजय हजारे, लेखक संशोधक व साहित्य अभ्यासक प्रा अरुण कांबळे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर आबा, सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी ही सांगलीच!
सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे- Tourist Places in Sangli District
गणेशदुर्ग किल्ला- सांगली शहरात मध्यभागी गणेशदुर्ग किल्ला आहे.
गणेश मंदिर- 1844 मध्ये श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी हे गणेश मंदिर बांधले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांनी या मंदिरात बैठका घेतल्या होत्या असे उल्लेख इतिहासात आढळतात.
कृष्णा वारणा नदीचा संगम- सांगलीपासून जवळच हरिपूर येथे कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम झाला आहे.
स्फूर्तिस्थळ- कृष्णा वारणा संगमावरच स्फूर्तिस्थळ नावाचे वसंतदादा पाटील यांचे स्मारक आहे.
सागरेश्वर अभयारण्य- सांगली शहरापासून हे अभयारण्य जवळ आहे व प्रसिद्ध आहे. खानापूर, पलूस, वाळवा या तीन तालुक्यामध्ये हे अभयारण्य पसरलेले आहे.
चांदोली धरण- बत्तीस शिराळा तालुक्यात वारणा नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चांदोली हे अभयारण्य देखील आहे. या जंगलात गवा, अस्वल, बिबट्या हे प्राणी आढळतात.
सांगली जिल्ह्यातील धार्मिक स्थळे- Temples in Sangli District
संगमेश्वर मंदिर - कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमाच्या ठिकाणी हे संगमेश्वर मंदिर आहे.
ब्रह्मनाळ - कृष्णा येरळा संगमावर हे मंदिर आहे.
रामलिंग - बहे या ठिकाणी हे रामलिंग आहे.
औदुंबर- सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे कृष्णा काठी वसलेले दत्त मंदिर आहे. हिंदू धर्मात अनेक पोथी पुराणात या स्थानाचे महात्म्य दिलेले आहे. कवी सुधांशु यांची काव्यसाधना इथेच केली.
सांगली जिल्ह्यातील महत्वाची ठिकाणे -
मिरज- हे एक महत्वाचे जंक्शन असून येथे अनेक प्रसिद्ध स्थळे आहेत. येथे भुईकोट किल्ला, ख्वाजा मिरासाहेब दर्गा ( 500 वर्षे जुना असून सर्व धर्मातील आणि पंथातील लोक इथे दर्शनास येतात) हे प्रसिद्ध आहे.
प्रचितगड, बानूरचा भूपाळगड, तासगावचे गणपती मंदिर, कौठे एकदंत येथील सिद्धरामाचे मंदिर, दंडोबा येथील उंच टेकडीवरील शंकराचे प्राचीन मंदिर, रेवनसिद्ध मंदिर हे काही सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणे आहेत.