जगातील रहस्यमय गणपती बाप्पांचे ठिकाणे | The Mysterious Places of Ganpati Bappa
मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का गणेश चतुर्थी का साजरी केली जाते? ज्वालामुखीच्या शिखरावर वसलेल्या गणेशाविषयी देखील तुम्हाला माहीत आहे का? सर्वात उंच गणेशाची मूर्ती कुठे आहे? याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
गणेश चतुर्थी का साजरी केली जाते? Why we Celebrates Ganesh Chaturthi?
भाद्रपदातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पांचा जन्म झाला म्हणून दरवर्षी या दिवशी गणेश चतुर्थी भव्यतेने साजरी केली जाते. असे देखील मानले जाते की गणेशाचा जन्म मध्यान्हच्या काळात झाला होता आणि म्हणूनच गणेश पूजेसाठी मध्यान्ह हा काळ अधिक योग्य मानला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार गणेशाच्या जन्माशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. यातील महत्वाच्या अशा दोन कथा आपण बघुयात.
असे म्हणले जाते की देवी पार्वतीने तिच्या शरीरातून काढून टाकलेल्या मळापासून गणेशाची निर्मिती झाली. भगवान शिव जे पार्वतीचे पती आहेत ते जेव्हा घरी परतले तेव्हा गणेशाला ते वडील आहेत म्हणून माहीत नव्हते. त्यांनी शिवशंकराला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे शिव शंकराला क्रोध अनावर होऊन त्यांनी गणेशाचे डोके उडविले. जेव्हा हे पार्वती मातेला कळाले तेव्हा त्या भगवान शंकर यांच्यावर रागविल्या. शंकराने गणेशाचे प्राण परत आणण्याचे ठरविले. मनुष्य शीर न मिळाल्याने शिवाने त्यांना हत्तीचे शीर बसविले. आणि आपले गणपती बाप्पा पुन्हा जिवंत झाले.
काही लोकांच्या सांगण्यानुसार शिव आणि पार्वती यांनी मिळून गणेशाची निर्मिती केली होती. त्यांना जन्म हा राक्षसांचा संहार करण्यासाठी झाला होता असे म्हणले जाते. कदाचित त्यामुळेच त्यांना विनाशक असे देखील म्हणले जाते.
गणेशोत्सव आपण प्रत्येक घरात साजरा करत असतो. गणेशाची गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना होते तर अनंत चतुर्दशीला हा उत्सव संपतो. या गणेशोत्सव काळात 4 मुख्य विधी असतात. पहिला म्हणजे चतुर्थीला गणेशाची स्थापना केली जाते. पुढे 10 दिवस आपण गणपतीची पूजा करतो. तिसरा विधी म्हणजे गणेशाची मूर्ती हलविली जाते. शेवटचा विधी म्हणजे गणपती विसर्जन विधी!
ज्वालामुखीच्या शिखरावर वसलेला गणपती, इंडोनेशिया
देशभरात आपण गणेशोत्सव साजरा करत असतो. विघ्नहर्ता सगळे काही विघ्न घालविण्यासाठी आलेला असतो. लोक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेत असतात. सार्वजनिक मंडळे त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना करत असतात. प्रत्येक भागात प्रसिद्ध गणेश मंदिर आहेच परंतु अष्टविनायक दर्शन देखील या काळात अगदी शुभ मानले जाते. इंडोनेशिया सारख्या देशात देखील अनेक गणेश मंदिरे आहे. इंडोनेशिया मध्ये ज्वालामुखीच्या अगदी जवळ एक गणेशाची मूर्ती आहे. तिचा इतिहास 700 वर्षांपासून आहे असे सांगितले जाते. इंडोनेशिया मधील सक्रिय ज्वालामुखी असलेल्या ब्रोमो पर्वताच्या ठिकाणी ही मूर्ती वसलेली आहे. स्थानिक लोक सांगतात की ही मूर्ती तिथे 700 वर्षांपासून आहे. इंडोनेशिया या देशात एकूण 141 ज्वालामुखी आहेत आणि त्यापैकी 130 ज्वालामुखी अजूनही सक्रिय आहेत. त्यापैकी एक हा माउंट ब्रोमो आहे. पूर्व जावा प्रांतातील ब्रोमो टेंगर सेमेरू या राष्ट्रीय उद्यानात हे पर्वत आहे. टेंगेरीस लोक या जावा प्रांतात राहतात. असे मानले जाते की त्यांच्या पूर्वजांनी या मूर्तीची स्थापना केली होती.
गणपतीची पूजा इथे कधीच थांबत नाही. इथे सतत ज्वालामुखीचा उद्रेक जरी होत असला तरी देखील ही एक परंपरा आहे.
यज्ञ कसडा हा या ठिकाणी एक उत्सव असतो. जवळपास 15 दिवस हा उत्सव चालतो. गणेशाच्या स्थापनेपासून हे सर्व अखंडपणे सुरू आहे असे सांगितले जाते. गणेश मूर्तीला फळे, फुले आणि बकऱ्यांचा प्रसाद म्हणून बळी दिला जातो. असे म्हणले जाते की जर असे केले नाही तर ज्वालामुखी उद्रेक होऊन इथले सर्व काही नष्ट होईल.
इथे जाताना तुम्हाला ब्रह्मदेवाचे मंदिर बघायला मिळतील. ज्वालामुखीच्या आत गणेशाची मूर्ती आहे. याठिकाणी आपल्याला इतरही मूर्ती बघायला मिळतील. सर्व मूर्ती या दगडांनी बनवलेल्या आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर देखील या सर्व मूर्ती आजही तशाच आहेत.
या ठिकाणी कसे पोहोचाल?
इथे येण्यासाठी थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल. सुराबाया या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊन तुम्हाला धुमरी बसने पुरबाया बस टर्मिनल ला जावे लागेल. हे अधिकृत बस स्थानक नसल्याने तुम्हाला बस ड्रायव्हर ला इथे थांबण्याची विनंती करावी लागेल.
इथे जात असताना तुम्हाला मास्क बाळगणे गरजेचे आहे. कोव्हिड मुळे नव्हे तर इथे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो म्हणून मास्क वापरणे गरजेचे आहे.
आशियातील सर्वात उंच गणेश मूर्ती
आशिया खंडातील गणेशाची सर्वात मोठी मूर्ती ही थायलंड या देशात आहे. Khlong Khuean, Chachoengsao Province, Thailand या ठिकाणी ही गणेश मूर्ती आहे. ही गणेश मूर्ती ब्रॉंझ म्हणजेच कांस्य या धातूपासून बनलेली आहे. 40 मीटर ही या गणेश मूर्तीची उंची आहे. या शहराला सिटी ऑफ गणेशा असे देखील संबोधले जाते. आंतरराष्ट्रीय उद्यानात ही मूर्ती आहे.
या मूर्तीला जास्त मोठा इतिहास नसून 2008 ते 2012 या दरम्यान ही मूर्ती तयार झाली. ही जागा पहिले उद्यान बनले आणि मग तिथे मूर्ती बसविण्यात आली. या गणेश मूर्तीची रचना अशी आहे की ती भूकंप आणि वादळे दोन्ही सहन करू शकते. गणेशाच्या हातात अनेक फळे आपल्याला बघायला मिळतात. गणेशाच्या पोटाला साप बांधलेला आहे. हातात लाडू आणि पायावर मूषक असे या मूर्तीचे रूप आहे. थायलंड शहरात गणेशाला नशीब आणि आशेची देवता म्हणून पुजले जाते.