वारणा धरण / चांदोली धरण, कोल्हापूर || Varna Dam / Chandoli Dam information in Marathi
धरणाचे नाव- वारणा धरण / चांदोली धरण (Varna Dam / Chandoli Dam)
बॅक वॉटर- वसंत सागर
नदीचे नाव- वारणा नदी
ठिकाण- चांदोली, शाहूवाडी
जिल्हा- कोल्हापूर
Varna Dharan / Chandoli Dharan Marathi Mahiti
कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण म्हणजे वारणा धरण होय. याच धरणाला चांदोली धरण असे देखील संबोधले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हा तालुका धरणांसाठी बनलेला आहे. वारणा धरण देखील याच शाहूवाडी तालुक्यात असलेल्या चांदोली गावाजवळ आहे. चांदोली गाव आता तिथे अस्तित्वात नाही परंतु त्या परिसराला चांदोली म्हणूनच ओळखले जाते. वारणा हे धरण सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेले धरण आहे. आपण सुरुवातीला धरण हे कोल्हापूरमध्ये आहे असे जरी म्हणालो असलो तरी देखील या धरणाचा समावेश हा दोन्ही जिल्ह्यांच्या धरणाच्या यादीत केला जातो. चांदोली हे धरण मातीमध्ये बांधकाम असलेले जास्त क्षमतेचे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे.
धरणाची निर्मिती ही वारणा नदीवर केली गेलेली असल्याने त्याला वारणा हे नाव मिळाले तर धरण चांदोली गावाच्या शेजारी असल्याने त्याला चांदोली धरण ही ओळख मिळाली. कृष्णा ही या भागातील मुख्य नदी असून वारणा नदी कृष्णा माईचीच उपनदी आहे. वारणा नदीचा उगम हा पाथरपुंज या ठिकाणी होतो. रामनदी देखील या धरणाच्या पाणीसाठयात हातभार लावत असते.
धरणाचे बांधकाम हे 2000 साली पूर्ण झाले. धरणाची उंची ही 291 फूट म्हणजेच 88.8 मीटर इतकी आहे. धरणाची लांबी ही 5184 फूट इतकी म्हणजेच 1580 मीटर आहे.धरणाला एकूण 4 दरवाजे आहेत.
वारणा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 34.40 टीएमसी म्हणजेच 34400 दशलक्ष घनफुट आहे. वारणा धरणाला महत्व असण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त जलसाठा असलेल्या धरणाच्या यादीमध्ये वारणा धरणाचा क्रमांक हा 7 वा लागतो. धरणाच्या जलाशयाला वसंत सागर असे संबोधले जाते.
धरणाचा वापर हा वीजनिर्मितीसाठी(20 मेगावॅट) देखील केला जातो. पाण्याचा उन्हाळ्यात येणारा प्रश्न या धरणाच्या निर्मितीने मिटला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने धरण परिसरात चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. यालाच सध्या आपण सह्याद्री व्याघ्रप्रकल्प म्हणून ओळखतो. प्रकल्पात आपल्याला किल्ले आणि धबधबे बघायला मिळतात.
चांदोली धरणाला भेट द्यायला कसे पोहोचाल?
चांदोली धरण किंवा वारणा धरण हे शाहूवाडी शहरापासून 42 किलोमीटर अंतरावर आहे. सांगली शहरापासून या धरणाचे अंतर हे 94 किलोमीटर आहे, तर कोल्हापूर शहरापासून 76 किलोमीटर अंतरावर चांदोली धरण आहे.