मृत्युंजय पुस्तकाचे परीक्षण || Mrutyunjay Book Review in Marathi

मृत्युंजय पुस्तकाचे परीक्षण || Mrutyunjay Book Review in Marathi

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत! परंतु याच भारतात अधर्मी कौरावांसह राहूनही निस्पृही क्षत्रिय धर्माचे पालन करणारा आणि अखिल भारत भूमीला शूरता, वीरता आणि दानशूरता पौरुषत्व याचा मंत्र देणारा, तरीही महाभारतात दखल न घेतला गेलेला महायोद्धा, परशुराम शिष्य, सुर्यपूत्र, मृत्यूवरही विजय मिळविणाऱ्या मृत्युंजय कर्णास आमचा सादर प्रणाम! 

Mrutyunjay-book-review-marathi

आज आम्ही आपल्या समोर शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीचे पुस्तक परीक्षण घेऊन येत आहोत. सुरुवात एका मोठ्या पुस्तकापासून करतोय परंतु त्यामागे कारणे खूप आहेत. गुगल करायला गेला तर मृत्युंजय कादंबरी ही मराठी पुस्तकांमध्ये अग्रस्थानी असते. म्हणून सुरुवात मृत्युंजय पासूनच!


पुस्तकाचे नाव - मृत्युंजय (Mrutyunjay/ Mrityunjay)

लेखक - शिवाजी सावंत

प्रकाशन - कॉन्टिनेंटल प्रकाशन

पब्लिशिंग हाऊस - मेहता पब्लिशिंग हाऊस

दीपस्तंभ दीप - 9/10


मृत्युंजय पुस्तक खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा!


मृत्युंजय कादंबरीला भारतीय ज्ञानपीठाचा 1996 सालचा मूर्तीदेवी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यासोबत अनेक इतरही पुरस्कार मिळालेले आहेत. फक्त मराठी पुस्तक नव्हे तर याची भाषांतरे देखील अनेक ठिकाणी गौरवली गेली आहेत. 


थोडंस लेखकाविषयी-

लेखक शिवाजी सावंत यांचा जन्म कोल्हापूर येथील आजरा या गावी 1940 साली झाला. कोल्हापूर मध्येच ते 20 वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य करत होते. त्यासोबत त्यांनी पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या लोकशिक्षण मासिकासाठी 6 वर्षे काम देखील बघितले. भारतीय जीवन आणि संस्कृती याबद्दल सावंतांना पूर्वीपासूनच अभिमान आणि जिज्ञासा होती. त्यांच्या मनात माझा भारत म्हणजे महाभारत हे समीकरण पक्के झाले होते. त्यांनी महाभारताचा अभ्यास सुरू केला. या काळात त्यांनी कथानायक कर्णाची संदर्भ भूमी म्हणून मध्यभारत, उत्तर भारत, पंजाब , हरियाणा अशा ठिकाणी स्वतः जाऊन अभ्यास केला. इतके अथक परिश्रम घेतले आणि त्याचेच फळ म्हणून आज ही कादंबरी आपल्या सर्व रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहे. 


मृत्युंजय Review 

बरेच वाचक हे या कादंबरीला देखणी कादंबरी असे म्हणतात. याच्या मागे अनेक कारणे असतील परंतु मला पटलेले कारण म्हणजे पुस्तकात अनेक चित्रे अशी आहेत जी जिवंत भास निर्माण करतात. पुस्तकाचे मुखपृष्ठ हे खूप रेखीव असून त्यात दानवीर ते धैर्यवीर कर्ण हे दीनानाथ दयाल यांनी उत्तम साकारले आहे. याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शरीरयष्ठी यावरून तो अचूक साधला गेला आहे हे समजून येते. मलपृष्ठावर स्वतः शिवाजी सावंत आणि त्यांना मिळालेल्या मूर्तीदेवी पुरस्काराचा फोटो आहे. 

मृत्युंजय हे पुस्तकाचे नाव कर्णाच्या असीम जीवन संघर्षाचे प्रतिबिंब आहे हे जाणवते. मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा ज्याने जीवनाचा धुंद विजय अनुभवला म्हणूनच त्याचे नाव मृत्युंजय! मृत्यूवरही विजय मिळविणारा... वरून बघितले असता पुस्तक खूप जाड आणि मोठे वाटतही असेल परंतु एकदा वाचायला सुरुवात केल्यावर त्याची तंद्री लागते आणि पुस्तकाचे जाड असण्याचे भूत आपल्या मनातून आपसूक उतरते. हे पुस्तक सावंतांनी मायभूमीच्या सौरक्षणात धारातीर्थी पावलेल्या शूरवीरांना अर्पण केलेलं आहे. 

पुस्तकाची प्रस्तावना आणि त्याचा मथळा मोठा लाघवी आहे. हृदयदान यातून लेखकाची लेखनाप्रति आणि वाचकांच्या प्रति असलेली समर्पणाची भावना दिसून येते. या पुस्तकाच्या वाचनाचा प्रवास जर आपल्याला सुरू करायचा असेल तर आपल्याला त्यांच्याविषयी थोडीफार माहिती नक्कीच हवी. हे पुस्तक कर्ण या व्यक्तिरेखेच्या भोवती फिरत असले तरी त्याला अनेक पैलू देखील आहेत. मुळात हे पुस्तक म्हणजे महाभारतातील महत्वाच्या व्यक्तिरेखांच्या स्वगताचा सारीपाठ आहे. कर्ण, कुंती, दुर्योधन, वृषाली, शौन आणि श्रीकृष्ण या साऱ्या व्यक्तिरेखांची स्वगत म्हणजे हे पुस्तक! ही फक्त स्वगत नसून या स्वगतामधून कर्णाच्या जीवनपटलाचा उलगडा होतो. याचाच अर्थ असा की आपण कर्ण या व्यक्तिरेखेकडे फक्त आपल्याच नजरेतून न बघता श्रीकृष्णासोबत सर्वांच्या नजरेतून पाहू शकतो. हीच या लेखकाची प्रतिभा आहे. जशा व्यक्तिरेखा बदलतात तसे वाचणारे आपण हे आपण स्वतः न राहता ती व्यक्ती होऊन महाभारतात प्रवेश करतो. आपण स्वतःला विसरून कधीतरी कर्ण कधी दुर्योधन तर कधी श्रीकृष्ण सुद्धा होतो. वाचकाला इतकी अत्युच्च अनुभूती देण्याचे सामर्थ्य फार कमी लेखकांना साधता आलेले आहे. लेखक शिवाजी सावंत यांचे यात सर्वात मोठे यश आहे. वाचकाला पूर्णत्व देण्याकडे त्यांचा प्रयत्न दिसतो. 

एकेक स्वगत हे अत्यंत महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असे त्यांच्या ठाशीव शैलीत लिहिले गेलेले आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढून देण्याकडे त्यांचा कल दिसतो. वाचकांच्या मनातील सुतपुत्र, त्याचा जन्म, त्याची कवच कुंडले याची उत्कंठा त्यांनी शेवटपर्यंत ताणली आहेत. लेखकाने सर्व ठिकाणांचा, पात्रांचा आणि शरीररचनेचा पोशाखांचा म्हणजेच अगदी निर्जीव वस्तूंचा परिचय डोळ्यासमोर उभा रहावा असा केलेला आहे. 

त्यापैकी कवच कुंडलांचे वर्णन हे तर अगदी विलोभनीय आहे. श्रीकृष्णाच्या स्वगताचा भाग तर जास्तच मोहक झाला आहे. पुस्तकाची भाषा ही काहीशी जड वाटू शकते पण ती भाषा कठीण जरी असली तरी ती तुम्हाला प्रेमात नक्की पाडेल. पुस्तकाची भाषा आणि वाक्ये अशी काही आहेत की ते वाचल्यानंतर तीच वाक्ये तुम्ही दैनंदिन जीवनात देखील खूप वापरू लागतात. 

मनोरंजनासाठी सांगायचे झाले तर शर्ट न मागता कापडाऐवजी माझी कवच कुंडले द्या रे! अशी हाक पुस्तक वाचून येऊ शकते. शब्दरचना ही सखोल आहे आणि वाक्यरचना तर अगदी सुंदरतेच्या शिखरावर आहे. त्यामुळेच पुस्तकाला इतकी जास्त लोकप्रियता मिळालेली आहे. 

अनेकांच्या आयुष्यात असे अनुभव आलेत की तर कितीही एकलकोंडे आणि स्वतंत्र असले तरी देखील ते या पुस्तकातील एखाद्या तरी पात्राशी स्वतःला जोडू बघतात. हे जर बदल घडले तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच होतील आणि आयुष्याला एक वेगळा दृष्टिकोन नक्की लाभेल. आपली शब्द संपदा ही समृद्ध व्हावी आणि आपल्याला महाभारतातील अनेक गोष्टींचा उलगडा व्हावा यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे!


दीपस्तंभ ने या पुस्तकाला दिले आहेत 10 पैकी 9 दीप! 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने