बटाट्याची चाळ पुस्तक परीक्षण || Batatyachi Chal Book Review in Marathi

बटाट्याची चाळ पुस्तक परीक्षण || Batatyachi Chal Book Review in Marathi

मुंबई... देशाची आर्थिक राजधानी! आज उंचच उंच मॉल मध्ये हरवलेली मुंबई पूर्वी कशी होती? या मुंबईला जर टाईम मशीन लावता आले आणि काळाच्या मागे नेता आले आले तर आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो की मुंबई ही बटाट्याच्या चाळीसारखी होती... नात्यांनी मजबूत, भावनेने प्रेमळ आणि लहान मुलासारखी खोडकर आणि चळवळ ! व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही म्हण निर्माण करणाऱ्याला ही म्हण चाळीकडे बघूनच सुचली असावी. चला तर मग या चाळीतल्या घरांमध्ये डोकावून येऊ... दुसऱ्या महायुद्धात ब्लॅक आऊटच्या निमित्ताने उडालेल्या जिन्यातल्या दिव्यांना नव्याने उजाळा देऊ! 

Batatyachi-chal-review-marathi

पुस्तकाचे नाव - बटाट्याची चाळ

लेखकाचे नाव - पु. ल. देशपांडे

पब्लिशर - मौज प्रकाशन गृह

अखंड महाराष्ट्राचे साहित्याच्या बाबतीत आराध्य दैवत कोण असेल तर ते पुल होय. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठी माणसांमध्ये पुल देशपांडे माहीत नाहीत असा माणूस सापडणे कठिण आहे. जरी असा कोणी सापडला तर त्याने स्वतः काहीतरी गमावलं आहे असे म्हणायला देखील काही एक हरकत नाही. पु ल हे आपले जगणे समृद्ध करतात. जीवनाकडे हसत हसत बघण्याचा दृष्टिकोन ते आपल्याला देतात. पुलंनी उभी केलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला आपलीशी वाटते. कारण पुलंनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला फिरत असतात, रोजच्या आयुष्यात येतात आणि भेटतात. त्यामुळेच पु ल हे आपल्याला आपलेसे वाटतात. 

त्यांचा जन्म हा स्वातंत्र्याअगोदर 1919 चा आहे. तो काळ त्यांच्या लिखाणातून आपल्याला स्पष्ट दिसून येतो. त्यांचा मृत्यू हा 2000 साली झाला. आयुष्याची 8 दशके त्यांनी साहित्य सेवेत घालविली. त्यांच्या याच साहित्यसेवेतील त्यांच्या हातून घडलेला शिरोमणी म्हणजेच बटाट्याची चाळ! हसता हसता प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावून स्वतः मध्ये डोकावू पाहायला लावणारे हे पुस्तक! 


बटाट्याची चाळ हे पुस्तक हाती घेतल्यावर त्याचे मुखपृष्ठ हे आपले लक्ष वेधून घेते. डेरेदार वृक्ष आणि त्यांचा बांध्यामध्ये वसलेली बटाट्याची चाळ. वरवर बघितले तर ती प्रचंड गजबजलेली दिसते, चाळीला आधार देण्यासाठी एखादा टेकू लागतो की काय असेच वाटते. त्यातली नाती एखाद्या वृक्षाइतकी भक्कम, त्यातही काहीशी गंमतच होती. पुस्तकातील सर्व चित्रे व मुखपृष्ठ हे वसंत सरवटे यांनी रेखाटलेले आहे. 

पुलंच्या या पुस्तकाला काही मोठी प्रस्तावना वैगेरे नाही. पुलंनी मोजून फक्त 4 ओळींमध्ये तीन वाक्ये लिहिलेली आहेत. प्रस्तावना इतकी छोटी असावी का? यातून पुलंचा साधेपणा हा नक्कीच स्पष्ट होतो. 

या पुस्तकात एकूण 12 प्रकरणे आहेत. प्रकरणे म्हणायला ती इतकी क्लिष्ठ नाहीये परंतु त्यांना आपण धडे म्हणालो तर पुलंना ते नक्कीच आवडणार नाही हे आम्हाला वाटते. त्यांना प्रकरण म्हणले तरच त्यात खरी मजा आहे. त्यातील काही प्रकरणाचा आता आपण ओझरता आढावा घेऊयात. 

पहिली दोन प्रकरणे हे सांस्कृतिक चळवळ आणि सांस्कृतिक शिष्ठमंडळ ही आहेत. या प्रकरणांमधून त्यांनी व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा ही विरुद्ध अंगाने रंगवताना पुलंनी त्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन्ही प्रकरणामध्ये ती चाळ, चाळीतील व्यक्ती आणि त्या व्यक्तींबाबतीत घडणारे किस्से याचे वर्णन ते करतात. 

गच्चीसह- झालीच पाहिजे, हे अजून एक छान प्रकरण. यामध्ये चाळीचा मालक हा नवीन झाल्याने तो काही नवीन सुविधा देण्याचे जाहीर करतो. यामध्ये तो गच्ची सर्वांसाठी खुली करतो. मग ती गच्ची आपली व्हावी यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू होतात. पुढे होणारी धमाल या प्रकरणात मांडलेली आहे. उपवास हे प्रकरण तर फारच मजेशीर आहे. पंतांचे वजन वाढल्याने ते डायट करायचे ठरवतात आणि त्या डायटचा कसा बोजवारा उडतो हे आजच्या काळातील साधर्म्य असणारी घटना त्यांनी रेखाटली आहे. रघुनानांची कन्येस पत्रे, काही वासऱ्या ही प्रकरणे सुद्धा उत्तमच आहेत. भ्रमण मंडळ म्हणजे या सगळ्यांचा कळसच आहे. इथे काही जण हे ट्रिप प्लॅन करतात, मग त्या ट्रिपचे काय घडते, ती कशी होते आणि त्यातल्या गमतीजमती काय घडतात हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचणे अत्यावश्यक आहे. 

एक चिंतन हे प्रकरण आपल्याला स्वतःत तसेच आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये खोल डोकवायला लावते. चाळ पूर्वी कशी होती आणि आता ती काय झाली आहे याचे दाखले ते देतात. आतमध्ये काहीसं वाईट वाटत परंतु आतमध्ये धागे तुटलेले नाहीयेत असा आशावादी दृष्टिकोन पुलं त्यांच्या लेखणीतून व्यक्त करतात. पुस्तकातील शेवटचे प्रकरण हे मनाला रुखरुख लावत असते. 


एकूणच हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील एक उत्कृष्ठ नमुना! आडवळनाणे पुलं बरंच काही सांगून जातात. त्यांच्यातील सारकॅसम खूप काही बोलून जातो. तो सारकॅसम आपल्याला हसायला लावतो परंतु नकळत घशात अचानक अवंढा येईल अशी तरतूद देखील करतो.  पुलंच्या प्रत्येक पुस्तकाचा दीपस्तंभ परिवार आणि अवघा महाराष्ट्र ऋणी आहे! 


दीपस्तंभ या पुस्तकाला देत आहे 10 पैकी 10 दीप! 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने