पुष्पा चित्रपटात दाखवलेले रक्तचंदन नक्की आहे तरी काय? ।। Red Sandalwood in Pushpa Movie
पुष्पा... पुष्पराज... मे झुकेगा नही! हा डायलॉग कित्येक पोरांच्या तोंडावर सध्या आहे. खांदा वाकडा करून चालणारी मुले तर तुम्हाला प्रत्येक चौकात दिसतील. कित्येक जणांनी तर आपल्या हिरॉईनचा नंबर श्रीवल्ली नावाने सेव्ह केला आहे. आशिक बनाया या गाण्याची जागा आता ओ अंतावा ने घेतलेली आपल्याला दिसते आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर सगळं पब्लिक आता पुष्पा चित्रपटाच्या नादात वेड झालं आहे. अल्लू अर्जुन उर्फ पुष्पा भाऊंनी केलेला धुरळा, काळीज बाद करून टाकणारी रश्मीका आणि फक्त तीनच मिनिटांत प्रेक्षकांना खूळ करणारी समंथा! जोडीला रेड्डी, मुंगलीस आणि शेखर सारख्या व्हिलन्स ची खुनखार ऍक्शन इतकं सगळं काही घेऊन आलेला पुष्पा मार्केट मध्ये खूप चालला.
साध्या गिरणीत काम करणारा पुष्पा सगळ्या सिंडिकेट चा बाप बनतो. हे सर्व घडते फक्त रक्तचंदनाच्या जीवावर! 1000 रुपयांच्या रोजंदारीवर रक्तचंदन तोडायला जाणारा पुष्पा तेच रक्तचंदन स्वतः विकून लॉर्ड बनतो. एखाद्याने टाईमपास करत जरी पिक्चर पाहिला असेल तरी त्याला कळत की रक्तचंदन या एका विषयावर हा चित्रपट पूर्ण फिरतो. हे रक्तचंदन इतकं महाग का असते? त्याचा वापर नक्की कशासाठी केला जातो? साधं चंदन आणि रक्तचंदन यामध्ये काय फरक असतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणुन घेणार आहोत.
रक्तचंदन म्हणजे काय? What is Red Sandalwood in marathi?
सर्वात आधी आपण जाणून घेऊयात हे रक्तचंदन नक्की काय असते. जस आपल्या साध्या चंदनाचे झाड असते तसेच रक्तचंदनाचे झाड असते. मात्र या झाडाची जात वेगळी असते. त्यामुळे साधे चंदन जसे सुगंधीत असते तसे मात्र रक्तचंदन नसते. रक्तचंदनाचे झाड जवळपास 8 ते 10 मीटर पर्यंत वाढते. त्याची वाढ अगदी हळू आणि निवांत होत असल्याने त्याचे लाकूड एकदम कडक बनते. सरळ वाढणाऱ्या या झाडाला पिवळी लहान फुले देखील येतात.
रक्तचंदन कुठे वापरले जाते? ।। Red Sandalwood Usage
चंदनाचा वापर साबण, परफ्युमस, गंध इतकंच काय तर माणूस मेल्यानंतर सरणासाठी देखील केला जातो. रक्तचंदनाचा वापर मात्र किरकोळ गोष्टींसाठी केला जात नाही. महागड फर्निचर, उंची मद्य आणि शोपीस बनविण्यासाठी रक्तचंदन वापरतात. आपल्या पैकी अनेकांच्या घरात उपचारासाठी वापरली जाणारी लाल बाहुली ही रक्तचंदना पासून बनलेली असते. जखमा आणि आजारांवर रक्तचंदनाचा लेप हा रामबाण उपाय असतो.
पुष्पा चित्रपटात दाखविल्या प्रमाणे जपानी लोक व्होयलीन सारखी वाद्ये देखील रक्तचंदना पासूनच बनवतात.
रक्तचंदन आणि साध्या चंदनातील फरक
रक्तचंदन आणि साधे चंदन यातील फरक त्याचा रंग आणि वास यावरून ओळखता येत असला तरी हा फरक ओळखण्यासाठी आणखी एक ट्रिक असते. रक्तचंदनाचे जे झाड असते त्याला घनता जास्त असते. त्यामुळे याचे लाकूड लवकर पाण्यात बुडते. चंदनाचे झाड तुम्हाला दिसेलही मात्र रक्तचंदनाचे झाड तुम्हाला दिसणे देखील कठीणच असते. तुम्हाला यावरून समजलेच असेल की या झाडाच्या दुर्मिळतेमुळे हे रक्तचंदन इतकं जास्त महाग असत.
रक्तचंदन कुठे सापडते? Where can we find Red Sandalwood?
संपूर्ण जगाचा जरी विचार केला तरी हे रक्तचंदन काही भागांमध्येच सापडते. भारतात रक्तचंदन फक्त शेशाचलमच्या पर्वत रांगांमध्ये काही ठिकाणी सापडते. रक्तचंदनाची झाडे दुर्मिळ असल्याने त्यांच्या वृक्षतोडीवर बंदी घालण्यात आलेली आहे.
भारता सोबत श्रीलंका आणि फिलिपिन्स मध्ये काही भागात रक्तचंदनाची झाडं सापडतात. रक्तचंदनाला भारतात दिल्ली, गुजरात आणि हिमाचल मधून या लाल चंदनाला जोरदार मागणी असते. सोबत सिंगापूर, अरब, चीन, जपान , ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये देखील रक्तचंदन डिमांड मध्ये आहे. चीन सर्वात जास्त रक्तचंदन आयात करत असते.
रत्नागिरी मधील रक्तचंदन
मध्यंतरी माध्यमांमध्ये एक बातमी आली होती की आपल्या रत्नागिरी मध्ये एक झाड आहे. त्या झाडाचे वय दीडशे वर्ष आहे. झाडाची किंमत जवळपास 150 कोटी असावी असा अंदाज सांगण्यात आला होता. हे झाड होते रक्तचंदनाचे! रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात चाफवली नावाचे एक गाव आहे. तिथल्या देवराईत सापडलेल्या या झाडावर स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ अनेक दिवस लक्ष ठेवून होते. हे झाड तिथे कसे आले याविषयी कोणालाही माहिती नव्हती.
रक्तचंदन तस्करी गुन्हा आहे
चित्रपटात जरी रक्तचंदन तस्करी करणारा पुष्पा हिरो दाखविलेला असला तरी देखील प्रत्यक्षात मात्र रक्तचंदन तस्करी करणे आणि वृक्षतोड करणे हा गुन्हा आहे. आधीच दुर्मिळ असलेली झाडे पर्यावरनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांची संख्या जर कमी झाली तर अनेक गोष्टींवर आपल्याला परिणाम सहन करावा लागेल. त्यामुळे फक्त रक्तचंदन नाही तर कोणतेही झाड कधीही तोडू नका.