एक होता कार्व्हर पुस्तक परीक्षण || Ek Hota Carver Book Review Marathi
शास्त्रज्ञ म्हणले म्हणजे तुमच्या डोळ्यांसमोर नक्की काय उभे राहते? प्रयोग करणारा, केमिस्ट्री मध्ये जर तुम्हाला रस असेल तर समोर अनेक रसायने असलेला एक व्यक्ती दिसेल किंवा एखादा असा व्यक्ती समोर येईल जो अनेक यंत्र वापरून काहीतरी सतत करत असणारा कार्यमग्न असेल! आपल्याला एखादा सनकी आहे अशीच प्रतिमा समोर येते. शास्त्रज्ञ म्हणले की अबोल, कोणाशी न बोलणार सहज कोनामध्ये देखील न मिसळणारा , स्वतःच्या आणि विज्ञानाच्या सिद्धांताशी झगडत सतत प्रयोग करत राहणारा आणि जेव्हा कधी तो यशस्वी होईल तेव्हाच जगाच्या समोर येणारा! याशिवाय काय गोष्ट समोर येणार, हो ना? आपल्या मनामध्ये शास्त्रज्ञांची हीच प्रतिमा बनलेली असते. शास्त्रज्ञ हा शब्द समोर आल्यानंतर आपल्या समोर कधीच शेतकरी आला नसेल. आजच्या घडीला कदाचित ते होऊ पण शकते कारण सध्या कृषी क्षेत्रात देखील खूप संशोधन सुरू आहे. असा एक शेतकरी जो शेतात राबतोय, शेतीवर प्रयोग करतोय, लोकांना समजवून सांगतोय असा शास्त्रज्ञ डोळ्यासमोर कोणाच्या आला असेल तर ते नवलच! जो शेतकरी शेतात कायम प्रयोग करत असतो त्याला शास्त्रज्ञच म्हणता येईल. शेतीत तो जे प्रयोग करत असतो ते जगासमोर आले तर बाकी लोक देखील त्यांच्या संशोधनाचे कौतुक मात्र नक्कीच करतील आणि इतरांना देखील त्याचा फायदा नक्कीच होईल. आता असे व्यक्ती आज तरी आहेत का? हो आहेत. अगोदर पासून होते आणि त्याच भूतकाळात एक होता कार्व्हर...
पुस्तकाचे नाव: एक होता कार्व्हर
लेखकाचे नाव: वीणा गवाणकर
अमेरिकेतील मिझोरी राज्यातील डायमंड ग्रो पाड्यावर कार्व्हर नावाचा एक जर्मन शेतकरी होता. त्या ठिकाणी मेरी नावाची एक निग्रो गुलाम होती. कार्व्हर याने इच्छा नसताना देखील त्याच्या पत्नीला मदत म्हणून त्या मेरीला स्वतःच्या घरी ठेवले होते. तिला कार्व्हरने 700$ मोबदला देऊन विकत घेतले होता.
एक दिवस एक चोरांची टोळी आली आणि त्यांनी मेरी आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलाला पळवून नेले. कार्व्हर यांनी त्यांना सोडवण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यात त्यांना काही गोळ्या देखील लागल्या. मेरी ला ते वाचवू शकले नाही परंतु त्यांनी तिच्या मुलाला मात्र वाचवले.
पुढे कार्व्हर त्या मुलाचा सांभाळ करतात आणि त्याला वाढवतात. त्याचे नाव जॉर्ज कार्व्हर असे ठेवण्यात आले. पुढे त्या मुलाचे कष्टात जीवन सुरू असते. त्याला बोलता देखील येत नसते. तो मुका आहे असेच वाटते. निसर्गाविषयी मात्र त्याला भरपूर आकर्षण होते. जॉर्ज पाने फुले आणि मातीचे एक वेगळ्याच दृष्टीने निरीक्षण करत असे. दुसऱ्यांच्या शेतात काम करून त्याने पैसे कमावले आणि त्यातून शिक्षण पूर्ण केले. जॉर्ज ने काढलेली चित्रे देखील उत्तम होती. अनेक संकटे समोर येत गेली परंतु अखेर सर्व संकटांवर मात करत त्याने शिक्षण पूर्ण केले. ज्या कॉलेज मध्ये त्याने शिक्षण घेतले त्याच कॉलेज मध्ये तो शिक्षक म्हणून रुजू देखील झाला.
डिसेंबर 1865 मध्ये निग्रो लोकांना अधिकृत स्वातंत्र्य मिळाले. अमेरिकेत सुरू असलेली गुलामगिरी नष्ट झाली. 40 लाख लोकांनी अनेक वर्षे पारतंत्र्य भोगले होते. ते सर्व लोक लगेच स्वातंत्र्य स्वीकारून प्रगती करायला सक्षम नव्हते. सर्व निग्रो लोकांना पुढे आणण्यासाठी अनेक नवीन संस्था सुरू झाल्या.यातील एक संस्था होती टस्कीगी! यामध्ये जॉर्ज शेती विभागाचे संचालक म्हणून रुजू झाले. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा तिथली अवस्था ही खूप बिकट होती. त्यांच्यासमोर हे मोठे आव्हान होते परंतु त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन हे आव्हान स्वीकारले. शेतीमध्ये एक वेगळीच क्रांती त्या भागात सुरू झाली. अनेक प्रयोग राबविले गेले.
जमिनीची पोत ही कापूस लागवडीने खूप कमी झालेली होती. ती सुधारवण्यासाठी त्यांनी भुईमूग पीक लावले आणि जमिनीची पोत सुधारवली. भुईमुगापासून त्यांनी जवळपास 300 हुन अधिक पदार्थ बनवून दाखविले. जॉर्ज यांच्या मार्गदर्शनाखाली आता जिथे फक्त कापूस पिकविला जात होता तिथे मात्र विविध पीक लावून त्यावर प्रयोग होऊ लागले. भुईमुगच नव्हे तर रताळ्याचे उत्पादन घेऊन जॉर्ज यांनी त्यापासून खूप पदार्थ बनवून दाखविले.त्यांनी केलेले प्रयोग प्रत्येकाच्या उपयोगाचे झाले. त्यांनी कधी त्यांचे पेटंट घेतले नाही किंवा पैसे कमावले नाही. त्यामुळे लोकांना मदत करणारा अवलिया म्हणून त्यांची सर्वदूर ओळख झाली.
जॉर्ज यांनी अनेक विद्यापीठात सल्ला दिला. त्यांनी पैशासाठी कधी काम केले नाही. 1896 ते 1943 या इतक्या मोठ्या काळात त्यांनी केवळ 125 $ इतकाच पगार घेतला. कॉलेज मध्ये असताना त्यांच्या मित्रांनी मिळून त्यांना एक सुट दिला होता आणि तोच सूट त्यांनी आयुष्यभर वापरला. आपल्याकडे असामान्य कला आणि कुशल असताना देखील सामान्य जीवन कसे जगायचे हे त्यांच्याकडून शिकावे.
श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेत सांगतात की कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहा! ही गोष्ट प्रत्यक्ष जीवनात खूप कमी लोक आणतात परंतु ज्यांना हे जमते ते यशस्वी होतात. कार्व्हर हे त्यापैकीच एक होते.
एक होता कार्व्हर हे पुस्तक आपल्याला प्रेरणा देते. निसर्गाशी एकसंघ राहून देखील आपण आपले आयुष्य आनंदात कसे जगावे हे या पुस्तकातून आपल्याला कळते. मराठी पुस्तक विश्वात या पुस्तकाला विशेष स्थान आहे. सर्वात जास्त मराठी आवृत्त्या असणारे हे विशेष पुस्तक आहे. आपण जेव्हा पुस्तक विकत घ्यायला जातो तेव्हा आपल्याला हे पुस्तक पहिल्या चाळणीत भुरळ घालते.
पुस्तकाचे आर्टवर्क हे उत्तम आहे. मुखपृष्ठ हे आवृत्तीनुसार काही बदललेले आहे परंतु जे मुख्य पुस्तक आहे त्यातील आतमधील आर्टवर्क हे विलोभनीय आहे. प्रत्येक प्रसंग चित्रांच्या माध्यमातून आपल्या डोळ्यासमोर उभा करण्याचे ध्येय इथे साध्य झालेले आहे. पुस्तकाचे चित्र मग त्यात मुखपृष्ठ आणि आतील चित्रे हे सतीश देशपांडे यांनी केलेली आहेत.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कार्व्हर यांचा प्रयोगात गुंतलेले असतानाच एक फोटो आहे. त्याखाली माणसाने निसर्गाशी कसे जोडून राहिले पाहिजे याची कल्पना देणारे चित्र रेखाटलेले आहे. मागच्या बाजूला कव्हर वर म्हणजे मलपृष्ठावर पुस्तकाचा सार दिलेला आहे.
पुस्तकाची भाषा अतिशय साधी व सोपी आहे. आपल्याला कुठेही डोक्याला त्रास देईल अशी भाषा वापरलेली दिसत नाही. लेखिका वीणा गवाणकर यांनी सुरेख शब्दांमध्ये हे चरित्र साकारले आहे. एखादा जर पट्टीचा वाचक असेल तर 1 ते 2 दिवसात पुस्तक पूर्ण वाचून काढतो. पुस्तकात चित्र आहेत त्यामुळे वयाने लहान मुलांना यात आवड निर्माण होईल.
पुस्तकाच्या अनुक्रमणिका आणि मनोगत वाचल्यावर आपल्याला असे जाणवते की लेखिकेवर संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रभाव आहे असे दिसते. पुस्तकाच्या शेवटी जॉर्ज यांच्या जीवनाविषयी माहिती दिलेली आहे. अमेरिकेकडून आलेल्या एका कृषी तज्ञाचा एक अभिप्राय देखील शेवटी जोडलेला आहे. यासोबत शेवटी संदर्भ सूची देखील दिलेली आहे त्यामुळे ज्यांना जॉर्ज यांच्या विषयी जास्त माहिती जाणून घ्यायची आहे ते याचा फायदा घेऊ शकता.
दीपस्तंभ एक होता कार्व्हर या पुस्तकाला देत आहे 10 पैकी 9 दीप!