बुलढाणा जिल्ह्याची संपूर्ण माहिती || Buldhana District Information in Marathi
महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात असलेला हा बुलढाणा जिल्हा लोणार सरोवर या उल्कापात झाल्याने प्रसिद्ध झालेला आहे. शेगांव सारखे धार्मिक स्थळ तर सिंदखेड राजा सारखे ऐतिहासिक स्थळ या जिल्ह्यात आहे.
बुलढाणा जिल्ह्याची माहिती - Buldhana District Information
बुलढाणा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 9661 चौरस किलोमीटर इतके आहे. बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या 25 लाख 88 हजार पेक्षा जास्त आहे.
बुलढाणा जिल्ह्यात एकूण 13 तालुक्यांचा समावेश होतो.
तालुके- खामगाव, चिखली, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, बुलढाणा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगांव, संग्रामपूर आणि सिंदखेड राजा
बुलढाणा जिल्ह्यातील शेती - Farming in Buldhana District
बुलढाणा जिल्ह्याचे हवामान हे उन्हाळ्या मध्ये उष्ण व कोरडे असते. हिवाळ्यात हवामान थंड असते. कापूस, ज्वारी, सोयाबीन आणि सूर्यफूल ही काही महत्वाची पिके या जिल्ह्यात घेतली जातात.
बुलढाणा जिल्ह्यातील नद्या व धरणे - Rivers & Dams in Buldhana
बुलढाणा जिल्ह्यातून अनेक नद्या वाहतात. या नद्यांमध्ये उतावळी, खडकपूर्णा, ज्ञानगंगा, टिटवी, नळगंगा, निपाणी, पूर्णा, बोर्डी, मन, मास, मोहना, वाण आणि विश्वगंगा या महत्वाच्या नद्या आहेत.
नळगंगा नदीवर मोताळा तालुक्यात नळगंगा नावाचे धरण आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे - Tourist Places in Buldhana District
सिंदखेड राजा-
राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी याच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या तालुक्यात झाला. इथे असलेल्या भुईकोट राजवाड्यात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्म झाला. मुंबई नागपूर हायवेच्या लगतच हे सिंदखेड राजा गाव असून वाड्याला भव्य असे प्रवेशद्वार आहे. आज हे ठिकाणी फक्त ऐतिहासिक स्थळ म्हणून नव्हे तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखले जाते.
आंदनसागर-
आनंदसागर हा श्री क्षेत्र शेगांव येथील एक सुप्रसिद्ध बगीचा आहे. शेगांव बाळापूर रस्त्यावर शेगाव पासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. हा परिसर शेगाव संस्थानाने बनवलेला आहे. जवळपास 350 एकर जागेवर हा बगीचा असून सध्या 120 एकर वर पर्यटन स्थळ बनविलेले आहे.
लोणार सरोवर-
हे एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झाले आहे. बेसॉल्ट खडकात निर्माण झालेले हे एकमेव विवर आहे.
गिरडा-
अजिंठा पर्वत रांगांमध्ये अध्यात्मिक पातळीवर नावाजलेला आणि निसर्गरम्य अशा डोंगर दऱ्यांमध्ये गिरडा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. प्राचीन शिव मंदिर आणि स्वयंप्रकाश बाबांच्या वास्तव्याने हे ठिकाण अध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचे बनलेले आहे. पांडव वनवासात असताना अर्जुनाने इथे पिण्याच्या पाण्याचा स्रोत निर्माण केला होता असा उल्लेख पुराण कथांमध्ये आहे. इथून 5 झरे निर्माण झाले आणि तेच पाणी आजही गोमुखातून बाहेर पडते असे सांगितले जाते.
ज्ञानगंगा अभयारण्य-
बुलढाणा खामगाव राज्यमार्गास लागून हे अभयारण्य सुमारे 205 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. इथेच बोधा हे जुने वनग्राम आहे.
अंबाबरवा अभयारण्य-
संग्रामपूर तालुक्यात सुमारे 127 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे. सातपुडा पर्वतरांगेत मध्यप्रदेश व मेळघाट सीमावर्ती भागात हे अभयारण्य आहे. नैसर्गिक वैविध्य आणि मुख्य वन पर्यटन केंद्र म्हणून हे अभयारण्य ओळखले जाते.
राजूर घाट-
बुलढाणा मलकापूर मार्ग परिसरात हा राजूर घाट आहे. परिसरात असलेली मंदिरे आणि ओढे, नदी नाले यामुळे निसर्ग सौंदर्यात आणखी भर पडलेली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील धार्मिक स्थळे - Temples in Buldhana District
श्री क्षेत्र शेगांव-
श्री गजानन महाराजांचे समाधी मंदिर इथे आहे. मंदिराच्या उत्तर व पश्चिम दिशेला भव्य प्रवेशद्वारे आहेत. निव्वळ 32 वर्षांच्या कार्यकाळात अध्यात्मिक क्षेत्रात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या संत श्री गजानन महाराजांनी 1908 साली त्यांच्या अवतार समाप्तीचे संकेत देत असताना "या जागी राहील रे" असे सांगत ज्या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला त्या ठिकाणी त्यांचे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले आहे.
बालाजी मंदिर व्यंकटगिरी-
बुलढाणा येथील राजूर घाटाच्या निसर्गरम्य परिसरात व्यंकटगिरी येथे बालाजींचे भव्य मंदिर आहे. तिरुपती येथील बालाजींची प्रतिकृती याठिकाणी साकारण्यात आलेली असून परिसरात हिरवाईने नटलेले डोंगर आहेत. इथे तुम्हाला हनुमानाची 21 फूट उंचीची भव्य मूर्ती देखील बघायला मिळेल.
बालाजी मंदिर मेहकर-
मेहकर या ठिकाणी देखील एक सुंदर असे बालाजी मंदिर आहे.
बालाजी मंदिर देऊळगाव राजा-
1665 मध्ये राजे जगदेवराव जाधव यानु हे मंदिर बांधले आहे.
महाबोधी बुद्ध विहार, धम्मगिरी-
धम्मगिरि बुलढाणा येथे महाबोधी बुद्ध विहार आहे. इथे शांतता खूप असते.
सैलानी बाबा दर्गा-
रेणुका देवी मंदिर, चिखली-
चिखली या गावाची रेणुकामाता ही ग्रामदेवता आहे. शहराच्या मधोमध हे मंदिर असून चैत्र पौर्णिमेला इथे यात्रा आयोजित केली जाते. चिखली या गावात भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे.
श्री क्षेत्र बुधनेश्वर, मढ-
पैनगंगा नदीचे हे उगम स्थान आहे. एका आख्यायिकेच्या अनुसार असे सांगितले जाते की पूर्वी सह्याद्री पर्वतावर गंगाजलाने भरलेला ब्रम्हदेवाचा कमंडलू सांडला. तो याच ठिकाणी पडला आणि तेव्हा पासून हे स्थान कुंडीका तीर्थ या नावाने प्रसिद्ध आहे.
हनुमान मूर्ती, नांदुरा-
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात 105 फूट उंचीची सर्वात मोठी भगवान हनुमानाची मूर्ती आहे. शहरातील हे आकर्षण असून ही मूर्ती संगमरवरी दगडात घडवलेली आहे.
याशिवाय पार्डा दराडे नावाचे एक गाव असून या ठिकाणी पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे. लोणार पासून काही अंतरावर पांगारा (डोले) हे गाव आहे. याठिकाणी भगवान बाबांचे मंदिर आहे. साकेगाव येथे जुने हेमाडपंथी मंदिर आहे. मोताळा तालुक्यातील तारापूर येथे अंबादेवीचे जागृत देवस्थान आहे. इथे असलेली मूर्ती राजा हरिश्चंद्र याने स्थापलेली असून नवरात्रीच्या काळात येथे भरपूर गर्दी असते. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले सिद्धेश्वर मंदिर सुल्तानपूर येथे आहे.